मोठ्या गणेश मूर्तींवर कोरोना विघ्न, मूर्तीकार आर्थिक संकटात

साईनाथ सोनटक्के
सोमवार, 29 जून 2020

आता दोन-तीन महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. केवळ मोठ्या मूर्ती तयार करू नका, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले. या उत्सवाबाबत शासनाकडून अजूनही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

चंद्रपूर : गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. गणेशोत्सवाला जेवढे आध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढेच सांस्कृतिकही महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात अवघा महाराष्ट्र सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघतो.

गणेशोत्सवाच्या पाच-सहा महिन्यांपूर्वीपासून मूर्तिकार तयारीला लागतात. माती, रंगरंगोटी, लाकडी साहित्य खरेदी करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मूर्तिकारांनी जय्यत तयारी केली. लाखो रुपयांचे कच्चे साहित्य खरेदी केले. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउन करण्यात आले. शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली. अशात आता दोन-तीन महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. केवळ मोठ्या मूर्ती तयार करू नका, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले. या उत्सवाबाबत शासनाकडून अजूनही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. मोठ्या मूर्तीतून वर्षभराची कमाई होत होती. मात्र, आता केवळ लहान मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. यातून खर्चही निघणे शक्‍य नाही. कोरोनाच्या विघ्नामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत.

गणेशोत्सव अवघा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या मूर्तिकारांनी आधीच तयारी करून ठेवली होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनाने यंदा मोठ्या मूर्ती तयार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशसानाच्या या सूचनेने मोठ्या मूर्तिकारांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कुंभार समाज आजही मूर्ती, विविध वस्तू तयार करण्याचे काम करीत आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव हा या मूर्तिकारांसाठी मोठा हंगाम असतो. वर्षभराची कमाई या हंगामात ते करीत असतात. चंद्रपूर शहरात मंडळाच्या मूर्ती साकारणाऱ्या मोठ्या मूर्तिकारांची संख्या 70 ते 80, तर घरगुती गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांची संख्या तीनशे ते चारशेच्या घरात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कच्च्या साहित्याचे भाव वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अनेक मूर्तिकारांनी माती, विविध रंग, सजावटीचे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी करून ठेवले होते. मात्र, मार्च महिन्यात देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाले. त्यानंतर प्रशासनाने गणेशोत्सव उत्साहात साजरा करू नये, मंडळांनी मोठ्या मूर्तीची स्थापना करू नये, असे सूचित केले. तसेच मूर्तिकारांनीसुद्धा मोठ्या मूर्ती तयार करू नये, अशा सूचना दिल्या. यामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. वर्षभर आतुरतेने प्रतीक्षा करीत असलेला हंगामच हातून जाणार असल्याच्या भीतीने करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या काळात मोठे मूर्तिकार आठ ते दहा लाखांची कमाई करीत असतात. परंतु, कोरोनाच्या विघ्नामुळे मूर्तिकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

सविस्तर वाचा - इस चम्पी मे बडे बडे गुन

यंदाचा हंगाम संकटात
गणेशोत्सवाची तयारी ही पाच-सहा महिन्यांपूर्वीपासूनच सुरू केली जाते. त्यामुळे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या मूर्ती तयार न करण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. कोरोनाच्या विघ्नाने यंदाचा हंगाम संकटात सापडला आहे.
किशोर देशट्टीवार,
मूर्तिकार, चंद्रपूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No big idols of Ganesh this year due to corona