गडचिरोलीत बैल बाजार भरलाच नाही, शेतकऱ्यांची यंदा गोऱ्ह्यांवरच चिखलणीसाठी मदार

मिलिंद उमरे
Saturday, 6 June 2020

यंदा कोरोना संसर्ग व त्यामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे बैलबाजार भरलेच नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोडीचा प्रश्‍न बिकट झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी घरातील गाईने जन्म दिलेल्या गोऱ्ह्यांनाच जोडीसाठी तयार करणे सुरू केले आहे.

गडचिरोली : शेतीचा खरीप हंगाम आता सुरू झाला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानशेतीच करतात. त्यात बांधीत चिखल करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. अलीकडे ही प्रक्रिया ट्रॅक्‍टरद्वारे होत असली, तरी ट्रॅक्‍टरच्या मोठ्या चाकांमुळे चिखलणीचा दर्जा थोडा घसरतोच. बैलांचे खूर लहान असल्याने चिखलणी चांगली होते. त्यामुळे अनेक शेतकरी त्यासाठी बैलजोडीला पसंती देतात. पण, यंदा उन्हाळ्यात कोरोना संसर्गाच्या सावटामुळे बैलबाजार भरलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी नवी जोडी किंवा कामाचे बैल खरेदी करता न आल्याने घरातील गोऱ्ह्यांनाच अनेक शेतकऱ्यांनी प्रशिक्षित करणे सुरू केले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतीकामांचा भार या कमी वयाच्या बैलांवर आला आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्‍टर लोकप्रिय असले, तरी शेतीत राबण्यासाठी अद्याप बैलांशिवाय पर्याय नाही. कोणत्याही शेतकऱ्यासाठी त्याची बैलजोडी प्राणप्रिय असते. पण, अनेकदा जोडीतील दोन्ही बैल किंवा एक बैल कधी वृद्धापकाळामुळे, कधी अपघात किंवा आजारपणामुळे मरतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नवी जोडी तयार करण्यासाठी बैल खरेदी करावे लागतात. त्यासाठी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी मोठे बैलबाजार भरतात. येथून शेतकरी आपल्या आवडीचे बैल खरेदी करून त्यांना शेतीसाठी प्रशिक्षित करतात. पण, यंदा कोरोना संसर्ग व त्यामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे बैलबाजार भरलेच नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या बैलजोडीचा प्रश्‍न बिकट झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी घरातील गाईने जन्म दिलेल्या गोऱ्ह्यांनाच जोडीसाठी तयार करणे सुरू केले आहे.
बैल साधारणत: दोन दाती झाल्यावर त्याला शेतीकामासाठी प्रशिक्षित केले जाते. पण, यंदा नाईलाजाने त्याहून लहान बैलसुद्धा शेतीकामांना जुंपण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. या बैलांचे प्रशिक्षण वेगवगळ्या पद्धतीचे व वैशिष्ट्यपूर्ण असते.
यातील पहिल्या पद्धतीत नव्या बैलावर धूर (जू) मांडणे महत्त्वाचे असते. त्यांना मानेवर धूर बाळगायची सवय होणे, त्यासाठी त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे असते. म्हणून नवा बैल जुन्या अनुभवी बैलासोबत जुंपतात. जुना बैल सरावलेला असल्याने त्याला धूर सांभाळणे, योग्य ठिकाणी वळणे आदी कौशल्ये आत्मसात असतात. सुरुवातीला नव्या बैलाला हे सारे कठीण जाते. तो वळण्याऐवजी जागेवरच फिरण्याचा किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण, जुन्या अनुभवी बैलाच्या सोबतीने हळूहळू तो ही कौशल्ये आत्मसात करतो.

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना
दुसऱ्या पद्धतीला घाणा पद्धत म्हणतात. घाण्याला बैल जुंपतात तशाच प्रकारे एक मोठा खुंटा जमिनीत गाडून त्याला आडवे लांब लाकूड किंवा बल्ली बांधण्यात येते. हे लाकुड संपूर्ण वर्तुळ फिरू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येते. त्यानंतर त्या लाकडाला नवा बैल जुंपण्यात येतो. या पद्धतीत बैलाकडे फार लक्ष देण्याची गरज नसते. तो दिवसभर गोल गोल फिरत राहतो. तिसऱ्या पद्धतीत एका मोठ्या लाकडाला खाच पाडून ते लाकूड बैलाच्या मानेवर विशिष्ट पद्धतीने ठेवतात त्यांना चरण्यासाठी मोकळे सोडून देतात. त्यामुळे बैलांना मानेवर वजन बाळगायची सवय होते. या प्रशिक्षणाच्या काळात बैलांना दोन वेळ अंघोळ, योग्य आहार व खांदे मजबूत करण्यासाठी शेकणे आदी प्रकारांकडे विशेष लक्ष दिले जाते. सध्या अशा अनेक पद्धतींनी नव्या बैलांना प्रशिक्षित करणे सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No bullak market in Gadchiroli this year due to lockdown