esakal | गणेशोत्सवावर पडलेय कोरोनाचे विरजण, साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav.

या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी,श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी, शक्‍यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे, मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्‍यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

गणेशोत्सवावर पडलेय कोरोनाचे विरजण, साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : सार्वजनिक गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. गणेशोत्सव जवळ आला की महाराष्ट्रात उत्साहाला उधाणयेते. घरोघरी आणि वस्ती-वस्तींमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू होते. यंदा मात्र या सगळ्या उत्साहावर विरजण पडणार असे संकेत आहेत. भक्तांची विघ्ने हरण करणारा अर्थात विघ्नहर्ता, विनायक म्हणजे सर्वांचा लाडका गणपतीबाप्पासुद्धा कोरोना संसर्गाच्या विघ्नातून यंदा सुटेल असे दिसत नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने अनेक नियम पाळून साजरा करायचा असल्याने गणेशभक्तांच्या आनंद व उत्साहावर विरजण पडणार असल्याचे दिसून येत आहे.

कोविड-19 साथरोगामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी निर्गमित केल्या आहेत. यासंदर्भात दिलेल्या सूचनेत त्यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी संबंधित तालुक्‍यांचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांची पूर्वपरवानगी घ्यावी, कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.

या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी,श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी, शक्‍यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे, मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्‍यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्‍य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.

गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्‍य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षाच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्‍य आहे, उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई आहे.

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती साध्या स्वरूपात प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी, शारीरिक अंतर राखून आरोग्यविषयक उपक्रम,शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांना कमाल 10 व्यक्तींना परवानगी असेल, श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी. जमावबंदी कलम 144 अंतर्गत आदेशाचे तंतोतंत पालन करावे, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीतकमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा -  पाठलाग करणाऱ्याच्या दिशेने तिने भिरकावला दगड, आणि एकाच दगडात...

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top