आठ दिवस अंधारात असलेल्या कलिगुडा गावाला त्याने पुरवला प्रकाश

gadchandur
gadchandur

गडचांदूर (चंद्रपूर ) : एकीकडे उन्हाचा कहर. शेतीची कामे सुरू आणि गावात आठ दिवसांपासून वीज गूल. वादळी पावसात वाकलेले वीजेचे खांब पुन्हा उभे करून वीज पुरवठा सुरू करण्याचे कष्टही घ्यायलाही कोणी तयार नाही. जेमतेम 25-30 लोकवस्तीच्या गावातील गावकऱ्यांनी या किमान गरजेसाठी उंबरठे तरी कोणाचे झिजवायचे आणि त्यांच्या मागणीला न्याय तरी कोण देणार, अशातच आठ दिवस गेले आणि शेवटी पोलिसांच्या वर्दीतील देवदुताने त्यांची दखल घेतली.

तेलंगणा राज्याच्या सीमेवर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला जिवती तालुक्‍यातील कलिगुड्या हे गाव डोंगरात वसले आहे. वादळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आणि संपूर्ण गाव अंधारात लोटले असतांना पाटण पोलिस स्टेशनचे ठाणेदार पी एस आय प्रकाश चौधरी यांच्या प्रकाशमय विचाराने विद्युत पुरवठा सुरळीत झाला.

आदिवासी बहुल जिवती तालुक्‍यातील कलिगुडा हे गाव म्हणजे केवळ 25-30 घरांची वस्ती. इथे कोलाम आदिवासी राहतात. स्वातंत्र्याला 70 वर्षे लोटली तरी विकास आणि प्रगती काय असते हे या गावातील नागरिकांना माहिती नाही. इथल्या आदिवासींना दररोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे गाव म्हणजे समस्यांचे माहेर घर आहे.

30 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यानी गावांतील विजेचे खांब वाकून पडल्याने गावातील वीज पूर्णपणे बंद होती. आठ दिवस लोटूनही कोणीही त्याचा दखल घेतली नाही. वीज पुरवठा सुरू करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. विजेचे खांब पडलेलेच होते. ही माहिती ठाणेदार चौधरी यांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महावितरण विभाग जिवतीशी संपर्क करून विद्युत पुरवठा सुरळित करून घेतला. विद्युत पुरवठा सुरळीत होताच गावांतील बाल गोपाल नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश पसरला.
लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
सीमेवरच्या आदिवासी बहुल गावांमध्ये अनेक समस्या वर्षानुवर्ष आहेतच.स्वातंत्र्याच्या इतक्‍या वर्षांनंतरही त्या सुटण्याचे नाव घेत नाहीत. लोकप्रतिनिधींनी इथल्या नागरिकांच्या निदान प्राथमिक गरजांकडे तरी लक्ष पुरवावे, अशी येथील आदिवासींची किमान मागणी आहे.

जनतेच्या सेवेसाठी तत्पर
पोलिस जनतेचे शत्रू नसून मित्र आहेत. पोलिस नेहमी नागरिकांच्या मदतीला तत्पर असतात. ते नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत या हेतूनेच मी व माझे सहकारी मिळून महावितरण विभागाच्या मदतीने गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केला.
प्रकाश चौधरी
ठाणेदार पाटण पोलिस
स्टेशन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com