हिंमते मर्दा तो...! साधनांशिवायच चालतो व्यायाम! कसा तो वाचाच

मिलिंद उमरे
Friday, 4 September 2020

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुठल्याही युवक किंवा युवतीला त्यांचे स्वप्न विचारले तर, पोलिस किंवा वनविभागात दाखल होणे, हेच स्वप्न असल्याचे ते सांगतील. जन्मापासूनच दारिद्र्य भोगणाऱ्या येथील मुलांची स्वप्नेही तशी मर्यादीत स्वरूपाचीच आहेत.

गडचिरोली : शरीर सुदृढ ठेवण्यासोबतच व्यायामामुळे सरकारी नोकरीही मिळते हे गडचिरोलीच्या गरीब, होतकरू युवकांना चांगलेच माहिती आहे. म्हणून येथील युवक शालेय जीवनापासूनच पोलिस व वनविभागात दाखल होण्यासाठी व्यायाम सुरू करतात. पण, त्यांना व्यायामाचे साहित्यच मिळत नाही. त्यामुळे कधी जंगलातील लाकडांचे बुंधे कापून सिंगल बार तयार करण्यात येतो, तर कधी सिमेंट-कॉंक्रिटचे मिश्रण वापरून बारबेल्स, डंबेल्स तयार करण्यात येतात.

गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुठल्याही युवक किंवा युवतीला त्यांचे स्वप्न विचारले तर, पोलिस किंवा वनविभागात दाखल होणे, हेच स्वप्न असल्याचे ते सांगतील. जन्मापासूनच दारिद्र्य भोगणाऱ्या येथील मुलांची स्वप्नेही तशी मर्यादीत स्वरूपाचीच आहेत.

पोलिस विभागात शिपाई किंवा वनविभागात वनरक्षक होण्याची त्यांची धडपड असते. कारण इतर क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी पैशांची तिजोरी मोकळी करावी लागते. ती त्यांच्याकडे नाही. पोलिस व वनविभागात शारीरिक क्षमतेला महत्त्व असल्याने इथल्या गर्द रानात, दऱ्याखोऱ्यात फिरून काटक शरीर कमावलेले युवक याच विभागांतील नोकरीवर आशा लावून असतात. त्यासाठी दररोज धावण्याचा सराव करतात. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी जीव तोडून मेहनत घेतात.

या दोन्ही विभागांत दौडसोबतच सिंगल बारवर पुशअप्स हा प्रकार आवश्‍यक असतो. पण, गावांमध्ये कुठलीच व्यायामाची साधने नसतात. तरीही, हिंमत न हारता येथील रानभूमी या गावातील युवकांनी झाडाच्या बल्ल्या कापून त्याच्यावर मजबूत बांबू आडवा बांधून देशी पद्धतीचा सिंगल बार तयार केला आहे. त्याच्या खालीच हात व दंड मजबूत करण्यासाठी बारबेल्स तयार करण्यात आले आहेत.

हे बारबेल्ससुद्धा घरगुती पद्धतीने सिमेंट-कॉंक्रिट व लोखंडाचा वापर करून तयार केले आहेत. कसेबसे मेहनतीने तयार केलेले हे साहित्य चोरीला जाऊ नये म्हणून सिंगल बारच्या बुंध्याशी सायकलच्या वायर लॉकने बारबेल्स बांधून ठेवले आहेत. यावरूनच हे साहित्य त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे कळून येते. ही स्थिती केवळ रानभूमी गावातीलच नसून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांतील आहे.

सविस्तर वाचा - Breaking: पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून अखेर साडे १६ कोटींची मदत जाहीर

कधी होणार जिल्हा क्रीडा संकुल ?
अनेक वर्षांपासून वनकायद्याच्या कचाट्यात अडकलेली जिल्हा क्रीडा संकुलाची जमीन आता क्रीडा विभागाच्या ताब्यात आली आहे. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रिडा संकुल निर्मितीसाठी निधीही मंजूर केला. त्याअंतर्गत येथील प्रेक्षागार मैदानावर सिंथेटिक रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव व इतर अनेक अत्याधुनिक क्रिडा सुविधा तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहसुद्धा निर्माण होणार होते. पण, अद्याप या कामांना सुरुवातच झाली नाही. या मैदानावर सध्या भाजीबाजार भरतो आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No exercise tools in Gadchiroli district