esakal | दुर्दैवी! नवेझरीत ४ वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू; प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाचं दुर्लक्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

hands

आंबेखारी उपकेंद्राअंतर्गत नवेझरी येथे २०१४ पासून पूर्ण वेळ, पूर्ण पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. परंतु त्यांचे नवेझरीवरून ८० किमीवर असलेल्या वडसा येथे २४ तास सेवा देणारे खासगी रुग्णालय आहे.

दुर्दैवी! नवेझरीत ४ वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू; प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाचं दुर्लक्ष 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त नवेझरी गावात मागील ४ वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. माता व बाल संगोपनावर वारेमाप खर्च करणाऱ्या शासनाच्या एकूणच योजनांवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

आंबेखारी उपकेंद्राअंतर्गत नवेझरी येथे २०१४ पासून पूर्ण वेळ, पूर्ण पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. परंतु त्यांचे नवेझरीवरून ८० किमीवर असलेल्या वडसा येथे २४ तास सेवा देणारे खासगी रुग्णालय आहे. नवेझरी गावातील माता व बाल मृत्यूची तसेच कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांच्या खासगी रुग्णालयाची माहिती तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकारी व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना माहिती आहे. 

हेही वाचा - घटस्फोटीत महिला झाली तीन महिन्यांची गर्भवती; प्रियकराचं सत्य समोर येताच उचललं कठोर पाऊल 

मृत्यू पावलेल्या मातांमध्ये रेखा बोगा आणि रमिता घावडे यांचा समावेश आहे. बालमृत्यूमध्ये लीलाबाई हिडामी यांचे बाळ व मुलगी, ज्योती कोरचा यांचे बाळ, मृत रेखा बोगा यांचे बाळ, मृत रमिता घावळे यांचे बाळ, बसंती केरामी यांची मुलगी, चंद्रकला तुलावी यांची जुळी मुले, समिका हलामी यांचा बाळ, दसोबाई उईके यांचा बाळ, कलावंती नरेटी यांचे बाळ, सुखवंती तोफा यांचे बाळ तसेच शेवंता काटेंगे यांच्या बाळाचा समावेश आहे. 

कोवळी बालके एका मागून एक जगाचा निरोप घेत असताना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या बोरकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी मूग गिळून आहेत. गावातील गरोदर माता व बालकांची नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार न केल्यानेच नवेझरी येथील तब्बल १४ माता-बालमृत्यू झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे डॉक्‍टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नवेझरी ग्रामसभेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र हिळामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वैद्यकीय अधिकारी दिसलेच नाहीत

आंबेखारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत सात गावांतील लोकांना आरोग्यसेवा पुरवली जाते. या केंद्रात आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती लेमदेव हर्षे यांची नियुक्ती आहे. त्यांना आजपर्यंत कुणीही पाहिले नाही, असे आंबेखारी येथील कुमारसाय गोटा यांनी सांगितले. नवेझरी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. विद्या बोरकर यांची नियुक्ती आहे. मात्र त्या नियुक्तीच्या ठिकाणी कधीही आलेच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या बोरकर यांचे पती डॉ. चंद्रकांत नाकाडे यांचीसुद्धा बेलगाव (घाट) आरोग्य उपकेंद्रांतर्गत कोहका येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून ४ एप्रिल २०१५ पासून नियुक्ती आहे. मात्र तेही गावाकडे फिरकत नसल्याचे बेलगावचे उपसरपंच अशोक गावतुरे यांनी सांगितले.

हेही वाचा - What an idea गुरुजी; ३० लाख विद्यार्थी सोडवताहेत 'स्वाध्याय', मोबाईलद्वारे...

कोरची तालुक्‍यातील बोटेकसा व कोडगूल या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत लक्ष देऊन काम करावे लागते. त्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या बैठकीला जावे लागते. मी काही शक्तिमान नाही सर्वांकडे लक्ष देण्यासाठी.
- डॉ. विनोद मडावी, 
तालुका वैद्यकीय अधिकारी, कोरची. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image