esakal | मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाची दुर्दशा; एकही कचराकुंडी नाही; प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

no Garbage dustbins in Vairagad village Gadchiroli

ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावात प्रचंड घाण निर्माण झाल्याने सर्वत्र रोगराई पसरून टायफॉईड, हिवताप व मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या गावाची दुर्दशा; एकही कचराकुंडी नाही; प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष 

sakal_logo
By
मनोजकुमार खोब्रागडे

वैरागड (जि. गडचिरोली) : लोकसंख्येने मोठे व ऐतिहासिक, अशी वैरागड या गावाची ओळख आहे. परंतु गावात येणाऱ्या रस्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकही कचराकुंडी नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे सरकारकडून स्वच्छता अभियानाचे ढोल बडवले जात असताना वैरागड मात्र एकही कचराकुंडी नसलेले गाव म्हणून कुप्रसिद्ध होत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गावात प्रचंड घाण निर्माण झाल्याने सर्वत्र रोगराई पसरून टायफॉईड, हिवताप व मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार दरवर्षी 2 ऑक्‍टोबर ते 20 डिसेंबर या कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान राबविण्यात येते. त्यासाठी सरकारकडून पुरस्कारही देण्यात येतो. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्वच्छता समिती स्थापन करून थातूरमातूर गाव स्वच्छ केल्याचे दाखवण्यात येते लहान खेड्यातसुद्धा कचराकुंडी लावून कचरा त्या कचराकुंडीतच टाकला जातो. नंतर कचरा गाडीने तो कचरा गावाच्या बाहेर फेकला जातो. परंतु वैरागड हे गाव लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्‍यातील सर्वांत मोठे गाव असूनही येथील मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. 

नागपुरात का फुगतोय कोरोनाचा आकडा? धक्कादायक माहिती आली समोर; चूक नेमकी कोणाची? 

सरकारकडून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळूनसुद्धा येथे विकासाच्या नावाने सगळे मुसळ केरात गेल्याचेच दिसून येते. आरमोरी तालुक्‍यातच नव्हे, तर एक प्राचीन ऐतिहासिक गाव म्हणून वैरागडच्या गडचिरोली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही मोठी प्रसिद्धी आहे. इतिहासाच्या अनेक पुस्तकांत या गावाच्या नावाचा उल्लेख आहे. असे असतानाही या गावात साधी कचराकुंडीचीसुद्धा व्यवस्था करण्यात येथील ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. 

या गावातील कोणत्याही रस्त्यावर कचराकुंडी नसल्याने गावात प्रवेश करताना कचऱ्याचे दर्शन घेऊनच प्रवेश करावा लागतो. येथे अनेक इतिहासप्रेमी व पर्यटक येत असतात. पण, गावाच्या वेशीवर येताच त्यांना कचरा, घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावाच्या प्राचीन ऐतिहासिक प्रतिमेला गालबोट लागत आहे. ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी करूनही ग्रामपंचायत यासंदर्भात कोणतीच सकारात्मक पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति रोष व्यक्त होत आहे. 

जिल्हा परिषदेने या गावाला कचरा वाहून नेणारी हातगाडी दिली आहे. पण, कचराकुंड्याच नसल्याने ही हातगाडी तशीच दुर्लक्षित पडली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन-तीन सदस्य सोडल्यास बाकी सर्व सदस्य तरुण आहेत. त्यांनी गावाचे पालकत्व स्वीकारल्याने गावातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता हे नव्या दमाचे गावकारभारी गावात कचराकुंड्या लावून गावाला अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढत गावाचा कायापालट करतात की, येरे माझ्या मागल्या प्रमाणे वागतात हे येणारा काळच ठरवेल.

'वक्त्यांची फॅक्टरी' कोमात, डिजिटल जोमात

ऐतिहासिक वारसा 

वैरागड गावाला प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ही महाभारतकालीन विराट राजाची विराटनगरी असल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. कधीकाळी येथे हिऱ्यांची खाण असल्याने या गावाचे पूर्वीचे नाव वज्रगड असे होते. त्याचाच अपभ्रंश पुढे वैरागड असा झाला. येथे भंडारेश्‍वर मंदिर, गोरजाई मंदिर, पाच पांडव मंदिर व ईदगाह आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला भंडारेश्‍वर मंदिरात, तर गोरजाई येथे माना समाजाच्या वतीने यात्रा भरत असते. तसेच येथे ऐतिहासिक किल्ला असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image