यंदा गणेशोत्सव शांततेत! ना लाऊडस्पीकर ना डिजे

मिलिंद उमरे
Tuesday, 25 August 2020

मागील काही वर्षांत गणेशोत्सवाचे पारंपरिक रूप मागे पडून त्याला डिजेच्या कर्कश्‍य आवाजाची सोबत मिळाली होती. सार्वजनिक गणेश मंडळात दिवस रात्र डिजे आणि लाऊडस्पिकरवर अनुप जलोटाच्या भजनापासून यो यो हनीसिंगच्या चार बोटल व्होडकापर्यंत काहीही दणदणाटी आवाजात वाजत रहायचं.

गडचिरोली : दरवर्षी गणेशोत्सव म्हटला की, प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात घणाणणारा लाऊडस्पिकर, डिजे, त्यावर वाजणारी कर्कश्‍य गाणी आणि परिसरातील नागरिकांना ऐकू येणारा कानठळ्या बसविणारा आवाज, हेच समीकरण झाले होते. पण, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवातील हे ध्वनिप्रदूषणाचे चित्र बदलून सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपती बसवणाऱ्यांनीही लाऊडस्पिकर, डिजे टाळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततामय वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा होताना दिसत आहे.

मागील काही वर्षांत गणेशोत्सवाचे पारंपरिक रूप मागे पडून त्याला डिजेच्या कर्कश्‍य आवाजाची सोबत मिळाली होती. सार्वजनिक गणेश मंडळात दिवस रात्र डिजे आणि लाऊडस्पिकरवर अनुप जलोटाच्या भजनापासून यो यो हनीसिंगच्या चार बोटल व्होडकापर्यंत काहीही दणदणाटी आवाजात वाजत रहायचं. गणपतीचं एक नाव शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान असलेला आहे. मोठे कान अगदी लहान आवाजाबद्दलही संवेदनशील असतात. त्यामुळे या शूर्पकर्णाच्या कानाचे काय हाल होत असतील ते हा शूर्पकर्ण आणि मूषक महाराजच जाणोत. केवळ सार्वजनिक गणेश मंडळेच नाही, तर काही उत्साही भक्तमंडळी आपल्या घरगुती गणपतीची आरास मांडताना मोठ्या आवाजातील गाणी दहा दिवस वाजवत बसायचे.

त्यामुळे अनेकांच्या घरातील शांतता भंग व्हायची. काही गणेश मंडळे शाळा, महाविद्यालये, रुग्णालयाच्या जवळ असतात. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांनाही मोठ्या आवाजाचा त्रास व्हायचा. अनेकांच्या घरी असलेल्या वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान बालके यांनाही या मोठ्या आवाजाचा त्रास व्हायचा. न्यायालयाने रात्री दहा वाजेपर्यंतच डिजे लावण्याचे आदेश दिले असतानाही या आदेशाचे सर्रास उल्लंघन व्हायचे. पण यंदा कोरोनामुळे डिजेचा दणदणाट शांत झाला असून ध्वनिप्रदूषण कमी झाल्याने पारंपरिक पद्धतीने गणेशपूजन करणाऱ्या भक्तांसह गणराजसुद्धा आनंदी झाला आहे.

सविस्तर वाचा - औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली जीवतीची भाजी झालीय दुर्मीळ

घेता येते सुखाची झोप
अनेक ठिकाणी रात्रभर वाजणाऱ्या डिजेमुळे परीसरातील नागरिकांना सुखाची झोप घेणे कठीण व्हायचे. खरेतर ज्या गणेशाला भक्तीपूर्वक नैवेद्य दिला जातो, त्याची दहा दिवस बडदास्त ठेवली जाते त्याला सगुण, सजीव म्हणूनच पूजले जाते. त्यालाही अशा आवाजांचा त्रास होऊ नये, अशी काळजी घेण्याची तसदी कुणीच घेत नव्हते. पण, कोरोनाने डिजेला गप्पगार करून टाकल्याने परिसरातील नागरिकांसह गणेशालाही सुखाची झोप नक्‍कीच घेता येत असेल.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No loudspeker no DJ