घरकुल विकण्याची परवानगी द्या अन्यथा आत्महत्या! दिव्यांगाचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

गेल्या दोन वर्षापासून घरकुल बांधकामाचे पैसे नगरपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने दुकानदाराची उधारी थकली त्यातच किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने शहरातील अपंग घरकुल लाभार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुल विकण्याची परवानगी मागितली आहे.

मारेगाव (जि. यवतमाळ) : मोठ्या थाटात प्रारंभ झालेल्या घरकुल योजनेमुळे गरीबांना आता हक्‍काचा निवारा मिळणार, असे चित्र उभे राहिले होते. मात्र ते केवळ स्वप्नच होते, या निष्कर्षावर येण्याची पाळी आता अनेकांवर आली आहे. या योजनेअंतर्गत घराच बांधकाम सुरू केलेल्या नागरिकांवर आता पश्‍चात्तापाची पाळी आली आहे. बांधकाम सामग्रीच्या दुकानदारांची उधारी थकली आहे. बांधकाम पूर्णन झाल्याने राहायचे कुठे? असा प्रश्‍न उभा राहिला आहे, या सगळ्याला कंटाळून आता या घरकुल लाभार्थ्यांनी शासनाकडे निवेदन दिले आहे.

गेल्या दोन वर्षापासून घरकुल बांधकामाचे पैसे नगरपंचायत प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने दुकानदाराची उधारी थकली त्यातच किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने शहरातील अपंग घरकुल लाभार्थ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुल विकण्याची परवानगी मागितली आहे.
2018-19 मध्ये मंजूर झालेल्या पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मारेगाव नगरपंचायतीअंतर्गत 120 नागरिकांना मिळाला यापैकी अनेक लाभार्थ्यानी आपली राहते घरे पाडून घरकुल बांधकाम सुरू केले.

मात्र या लाभार्थ्यांना घर बांधकामाचे हप्ते मिळविताना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तेव्हा त्यांना घरकुलाचे दोन हप्ते मिळाले .परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या लाभार्थ्याना घरकुल बांधकामाचा निधी प्रशासनाकडून उपलब्ध न झाल्याने लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
ज्यांच्याकडून बांधकामाचे साहित्य घेतले असे दुकानदार उधारीसाठी तगादा लावित आहेत. टाळेबंदीमुळे हाताला काम नाही किरायाच्या घराचे पैसे बाकी आहे त्यामुळे या घरकुल लाभार्थ्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहे

सविस्तर वाचा - गुन्हे शाखेमुळे गॅंगवार टळला, हे आहे कारण...

जगणेच कठिण बनल्याने शहरातील दिव्यांग घरकुल लाभार्थी चिंतामण बोरेवार यानी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून किरायाच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने आणि घरकुलाचे बांधकाम करणेही शक्‍य नसल्याने घरकुल विकण्याची परवानगी द्या नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No money for Ghrkul Yojana by nagar parishad