esakal | हातात पैसा नाही अन्‌ मुलंबाळं बाहेरगावी; काय करावे सूचेना! 
sakal

बोलून बातमी शोधा

Hatmag

भंडारा : देशात लॉकडाउन सुरू असल्याने पोटासाठी रोज धडपड करणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यात हातातील कामही बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच हजारो किलोमीटर दूर सुरतला गेलेल्या आप्तस्वकीयांची काळजी वाढत आहे. अशी दुहेरी चिंता जिल्ह्यातील विणकर बांधवांवर आली आहे. 

हातात पैसा नाही अन्‌ मुलंबाळं बाहेरगावी; काय करावे सूचेना! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : देशात लॉकडाउन सुरू असल्याने पोटासाठी रोज धडपड करणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यात हातातील कामही बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच हजारो किलोमीटर दूर सुरतला गेलेल्या आप्तस्वकीयांची काळजी वाढत आहे. अशी दुहेरी चिंता जिल्ह्यातील विणकर बांधवांवर आली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्‍यांत पूर्वीच्या काळापासून विणकर बांधव हातमागावर कापड तयार करीत होते. तयार झालेल्या कपड्यांची इतर जिल्ह्यात विक्री केली जात होती. परंतु, आधुनिक काळात यंत्रमागावर "सुपर फाईन' कापड निर्मिती सुरू झाल्याने विणकर बांधवांचा व्यवसाय काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे हजारो कुटुंबीयांनी पर्यायी व्यवसाय म्हणून शेती, मजुरीचे काम सुरू केले. मात्र, विणकर व्यवसायातील कसब असल्याने शिक्षित युवकांनी कापडांच्या मिलमध्ये नोकरी मिळवली. त्यांच्या मागोमाग इतर युवकांनीही नोकऱ्यांसाठी गुजरात राज्यात स्थलांतर केले. सद्यःस्थितीत मोहाडी व पवनी तालुक्‍यातील हजारो कुटुंब सुरत व इतर शहरांतील कापड मिलमध्ये कार्यरत आहेत. आंधळगाव, मुंढरी, मोहाडी, गणेशपूर, पवनी येथील 20 ते 25 वर्षांपासून कापड कारखान्यात कार्यरत आहेत. 

अवश्य वाचा- या जिल्ह्यातही केला कोरोनाने शिरकाव; महिला रुग्ण आढळली पॉझिटिव्ह 

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू केले आहे. यामुळे विणकर बांधवांचे हातातील काम बंद पडले आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबाचा प्रपंच चालविताना दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागत आहेत. अपुरी संसाधने व रोजगाराच्या अभावामुळे त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट येत आहे. याचवेळी कुटुंबातील कमावता मुलगा त्याच्या कुटुंबासह शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरात गेला आहे. तेथे त्यांचेही काम ठप्प झाले असून, सोबत चिमुकली नातवंडे आहेत. त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी तर नसतील, अशा चिंता येथील विणकर समाजाचे प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांना सतावत आहेत. याबाबत वारंवार फोन करूनही त्यांचे समाधान होत नाही. शिवाय दूरवर गेलेल्या कुटुंबीयांसाठी काही करताही येत नाही. यात एकमेकांना धीर देऊन दिवस काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

सर्वत्र टाळेबंदी, वेतनाची वाणवा 

सुरत येथे कार्यरत असलेल्या मुलाने त्याच्या वडिलांना फोनवरून सांगितले की, तेथे सगळी दुकाने, कारखाने बंद आहेत. कंपनीत एक महिन्यापासून काम बंद असल्याने मालक वेतन देण्यास टाळाटाळ करीत आहे. भाड्याच्या छोट्या खोलीत मुलांसोबत दिवसभर बसूनच राहावे लागते. वाहतुकीची साधने बंद असल्याने गावाकडे येता येत नाही. अशी मुलांची अडचण असल्याचे पवनी येथील दिवाकर धकाते यांनी सांगितले.