
यवतमाळ : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या 31 जुलैपर्यंत यवतमाळसह अन्य तीन तालुक्यांत लॉकडाउनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शनिवारी पोलिस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविल्याने अनेकांना घरचा रस्ता धरावा लागला.
रविवारी रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून आली. सोमवारी (ता.27) शासकीय कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सकाळी अकरापर्यंत रस्त्यावर ये-जा सुरू होती. मात्र, त्यानंतरही दिवसभर उत्साहींचे भ्रमण सुरूच होते. कोणत्याही मार्गाने गेल्यास कुठेच अडवणूक होत नसल्याचा फायदा तरुणांकडून घेतला गेला.
गळ्यात ओळखपत्र लटकविणे म्हणजे फिरण्याची मोकळीक असाच समज काहींनी करून घेतला. रस्त्यावर विनाकारण येण्यास मनाई असल्याने तरुणांच्या टोळक्यांनी आपापल्या घराच्या आजूबाजूची जागा पकडून गप्पांचा फड चांगलाच रंगवला.
बाजारपेठेत सामसूम असली तरी, गल्लीबोळातील गर्दी कोरोनाचे संकट वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला असला तरी काहींना अजूनही त्याचे महत्त्व समजले नाही.
लॉकडाउनमध्ये दुकाने कडकडीत बंद असल्याने बाजारपेठेत सामसूम आहे. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची कुठेही अडवणूक होत नसल्याचा फायदा उचलला जात आहे. कोणतेही काम नसताना तरुण, तरुणी रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र सोमवारी (ता.27) दिवसभर बघावयास मिळाले. लॉकडाउनमधील भ्रमणामुळे वारे यवतमाळ...म्हणण्याची वेळ आली आहे.
सविस्तर वाचा - जलसंजीवनी ही बालकांसाठी आहे खरी संजीवनी
पालकांनी "हा' मोह आवरावा
रात्री जेवण झाल्यावर पालक आपल्या लहान मुलांना घेऊन बाहेर फिरण्यासाठी निघतात. यवतमाळ शहरातील अनेक भागात रात्रीदरम्यान फिरणाऱ्यांची जत्राच बघावयास मिळते. अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग न पाळता जवळजवळ बसूनच चर्चा करतात. रात्री उशिरापर्यंत बिनधास्त फिरणे सुरू असते. पालकांनी आपल्या लहान मुलांना घराबाहेर आणण्याचा मोह टाळायलाच हवा.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.