म्हणे कोरोनाची धास्ती! बससेवा सुरू पण प्रवासीच नाहीत

empty ST stand
empty ST stand

गडचिरोली : कोरोनाने प्रत्येकाच्या मनावर भीतीचे साम्राज्य प्रस्थापित केले आहे. गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे बंद असलेले एकेक व्यवहार सुरू होत आहेत. जिल्ह्यांच्या सीमाही खुल्या झाल्या आहेत. जिल्हांतर्गत बससेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र त्या बसेसमधून क्‍वारंटाईनचे शिक्‍के हातावर मारलेले प्रवासी प्रवास करीत असल्याने इतर प्रवासी बसमधून प्रवास करणे टाळत आहेत. परिणामी एसटीचे उत्पन्न घटत आहे.
शासनाच्या आदेशानंतर राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गावर बस सेवा सुरू केली. मात्र, बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांच्या हातावर शिक्‍के मारल्याचे दिसून येत असल्याने अन्य प्रवासी कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी बसमध्ये प्रवास करण्यास नकार देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
लॉकडाऊन तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने बस सेवा बंद केली होती. त्यानंतर मागील महिन्यात जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला काही दिवस परराज्यातून आलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून देण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या . त्यानंतर काही मार्गावर नियमित प्रवाशांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली. याचा फायदा बाहेरून आलेल्या लोकांना झाला. मात्र, बसमध्ये हातावर शिक्के मारलेले प्रवासी दिसून आल्याने अनेक ठिकाणी अन्य प्रवासी बसमधून खाली उतरल्याचे प्रकार घडले. त्यातच कोरोनाबाधित लोकांची बसमधून ने आण केली जात असल्याचा गैरसमज पसरल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रवासी खासगी किवा वैयक्तिक वाहन वापरण्यावर भर देत आहेत. त्यामुळे एसटी बसला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराला दररोज 9 ते 10 लाख रुपयाचे उत्पन्न मिळत होते. मात्र, आता 50 टक्‍के प्रवासी वाहतुकीची सूट असतानाही दररोज केवळ 5 ते 6 हजार रुपयावरच वाहकाला समाधान मानावे लागत आहे. त्यातच गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नागरिकांकडून प्रवासाबद्दल सतर्कता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे. एकूणच जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू झाल्यानंतरही आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या मार्गावरही एसटीच्या वाहकाला रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. याचे नेमके कारण कोरोना संसर्गाची भीती असल्याचे सांगितले जात आहे.
बस सेवेला अत्यल्प प्रतिसाद
गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत अहेरी व देसाईगंज या मार्गावर बस फेरी सुरू आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प प्रतिसाद आहे. आर्थिक दृष्टीने हे महामंडळाला परवडण्यासारखे नाही. परंतु प्रवासी सेवेला आमचे प्राधान्य आहे. सध्या दररोज 5 ते 6 हजार एवढेच उत्पन्न मिळत आहे. बसस्थानकात गर्दी झाल्यानंतर प्रवाशांच्या मागणीनंतर त्या मार्गावर बस उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे.
मंगेश पांडे, आगार व्यवस्थापक गडचिरोली.

सविस्तर वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चौघांनी पाजली दारू, पुढे काय झालं वाचा...
आणखी एक कोरोनाबाधित
गडचिरोली जिल्ह्यात दिवसेनदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावरचा ताण वाढला आहे. सोमवारी (ता.1)जिल्ह्यात एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. नवा रुग्ण चामोर्शी तालुक्‍यातील आहे. त्यामुळे कोरोनाबाधित ऍक्‍टीव रुग्णांची संख्या 30 झाली आहे. मागील दोन दिवसात सिरोंचा तालुक्‍यात एक, एटापल्ली व मुलचेरा तालुक्‍यात प्रत्येकी एकेक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला. चामोर्शी तालुक्‍यात सोमवारी आढळून आलेला एक रुग्ण मुंबईहून आला असून, त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटीव रुग्णांची संख्या 38 झाली आहे. यातील दोन रुग्ण वगळता सर्वच मुंबई येथून प्रवास करून आल्याचे आढळून आले. जिल्ह्यात 2 हजार283 रुग्ण संशयित असून 468 लोकांचे नमुने येणे बाकी आहे. आतापर्यंत 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होईन घरी गेले असून 6 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आली आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com