शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे अन्‌ काळीज इवल्या बीजात !

paus
paus
Updated on

पुसद(जि. यवतमाळ)  :शब्दात पकडता येत नाही
                                  इतका पाऊस...
                              बरसला तर उगवेल
                             या धरित्रीची कुस...
मोसमी वारे मजल दरमजल करीत राज्यात आले खरे, परंतु पावसाने अजून पुरेसा फेर धरलेला नाही. मृग नक्षत्रात जेमतेम पाऊस झाला. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला, तर ग्रह-नक्षत्रे चांगला पाऊस घेऊन येणार, असे योग असल्याचे पंचांगकर्त्यांनी सांगितले. या दिलासादायक बातमीने हुरळून जात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. कुठे बियाण्यांचे अंकुर जमिनीवर आलेत, तर कुठे पावसाअभावी कोमेजून गेले. सूर्याने आद्रा नक्षत्रात प्रवेश केला. परंतु पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.

पुसद तालुक्‍यात आतापर्यंत केवळ 148 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मृग व आद्रा नक्षत्रातील पावसाची ही सरासरी 200 मिलिमीटर पेक्षा अधिक अपेक्षित होती. सध्या पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे धुवाधार पडतो, तर कुठे शेतजमिनीचा वरचा पापुद्राही भिजत नाही. गुरुवारी सायंकाळी पुसद शहराच्या आजूबाजूच्या गावशिवारात पाऊस बरसला. तर माळपठारावर पावसाचा थेंबही पडला नाही. कालच्या पावसाची नोंद 9.4 मिलिमीटर एवढी करण्यात आली.

या 'स्केटर्ड' पावसामुळे जमिनीच्या वर तरारून आलेल्या रोपट्यांचे सिंचन कसे होणार? या रोपांची वाढ कशी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कोरोनाचा आर्थिक कणा मोडणारा काळ, विक्री अभावी शेतमाल घरातच, तर कुठे शेतमाल विक्रीचा पैसा कधी मिळणार याचीच चिंता. पीक कर्ज नाही, घरातील सोन्याचे किडूकमिडूक विकून कशीबशी पेरणी केली, तर निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीनची उगवण झाली नाही. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या समोर तोंड वासून उभे झाले. शेतकऱ्यांच्या या संक्रमण काळात पावसाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

खरे तर, आता शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. कधी काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरून येते, परंतु पाऊस आणणारे हे ढग वाऱ्यासवे कुठे पसार होतात ते कळत नाही. आर्द्रा नक्षत्रातील पाऊस व ढगांचा लपंडाव सारखा सुरू आहे.

खरे पाहता शेती व शेतकऱ्यांचे जीवन पावसाच्या ऋतुचक्रावर अवलंबून आहे. पावसाने दडी मारली की शेतकऱ्यांचे हात कपाळावर व डोळे आभाळाकडे लागतात. हवामान बदलामुळे दरवर्षी सारखीच परिस्थिती पहावयास मिळते. पाऊस वेळेत आणि पुरेसा आला तर पिकांची वाढ जोमाने होते. पावसाच्या नऊ नक्षत्रांनी साथ दिली तर उत्पन्नात भरभराट होऊन शेतीत समृद्धीचे गाणे सारेजण गाऊ लागतात. मात्र पुरेशा पावसाअभावी पिके मोडली तर, शेतकऱ्यांचा पाठीचा कणा मोडतो. बदलत्या निसर्गचक्रात मान्सूनही आपली 'चाल' बदलत असल्याने शेतकरी मात्र गलितगात्र झालेला पाहावयास मिळतो. सध्या पिकांच्या कोवळ्या रोपट्यांना पाऊससरींची नितांत आवश्‍यकता आहे. पावसाची ही गरज भागली तर पिके जोमात वाढण्याची व पुढे भरघोस उत्पादनातून समृद्धीची वाट सुखद होण्याची शक्‍यता आहे. परंतु सध्या तरी पावसाची आबादानी पिकांनी पहावी, अशी शेतकऱ्यांची आभाळातील काळ्याकुट्ट ढगांना विनवणी आहे .


सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही

पाऊस म्हणजे अमृत !
पाऊस म्हणजे शेतीसाठी अमृत होय. पाऊस धारा कोसळल्या की पिकांना तजेला मिळतो. वातावरणातील नत्र पाऊस सोबत घेऊन येतो. साहजिकच पिकांची वाढ झपाट्याने होते. पाऊस न आला तर शेतकरी रोपटे जगविण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करतात. परंतु नैसर्गिक पाऊस हा पिकांसाठी अमृतपान ठरतो. वरुड शिवारात चांगल्या सरी कोसळल्याने जमिनीवर आलेल्या कोंबांना ऊर्जा मिळाली, असे वरुडचे शेतकरी संभाजी टेटर 'सकाळ'शी बोलताना संगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com