आश्रमशाळा शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन नाही! कुटुंबियांवर उपासमारीची पाळी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

विशेष म्हणजे या शिक्षकांच्या खात्यात 1 तारखेला वेतन जमा करण्याबाबत या विभागाने 16 मे 2018 ला शासन निर्णय निर्गमित केले. वेतनास विलंब होण्यास जबाबदार असलेल्या घटकावर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
त्यानंतरही आश्रमशाळांचे वेतन दोन ते तीन महिने प्रलंबित राहणे नेहमीचेच झाले आहे. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही.

कोरपना (जि. चंद्रपूर) :  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून झाले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.

विशेष म्हणजे या शिक्षकांच्या खात्यात 1 तारखेला वेतन जमा करण्याबाबत या विभागाने 16 मे 2018 ला शासन निर्णय निर्गमित केले. वेतनास विलंब होण्यास जबाबदार असलेल्या घटकावर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
त्यानंतरही आश्रमशाळांचे वेतन दोन ते तीन महिने प्रलंबित राहणे नेहमीचेच झाले आहे. मात्र, आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही.

शिक्षकांना तीन-तीन महिने वेतन मिळत नसल्यामुळे त्यांचे कर्जहप्ते, विम्याचे हप्ते, मुलांची फी भरण्यास उशीर होत आहे. त्यामुळे भरमसाठ व्याजाचा भरणा करावा लागतो. इतरही अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वेतन तथा इतर अन्य गंभीर समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे.

हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत सात कोरोना बाधित, राज्य राखीव दलाच्या तीन जवानांचाही समावेश

त्यानुसार आश्रमशाळा शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे लाभ देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीत दोन्ही हप्ते जमा करणे, वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे, डिसीपीएस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते रोखीने अदा करणे, डिसीपीएस कपात रकमेच्या हिशोब चिठ्या तयार करणे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत आश्रमशाळा शिक्षकांना वेतनात प्रोत्साहन भत्ता लागू करणे या मागण्यांचा निवेदनात समावेश होता. आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन व इतर समस्या आठ दिवसांत निकाली न निघाल्यास संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विमाशिचे जिल्हा कार्यवाह किशोर नगराळे यांनी दिला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No salary of Aashram school teachers from three months