लखमापूरातील शैक्षणिक काळोख अधिकच गडद

निलेश झाडे/सिताराम मडावी
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

गाव अंधारात बुडाले असताना गावाची शैक्षणिक स्थिती अधिकच बिकट आहे. लखमापूरात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता असलेली शाळा आहे. या शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत. या दोघांना शिकवायला दोन शिक्षक कार्यरत आहेत.

पाटण : गाव अंधार पांघरून बसला आहे. पुढच्या पिढीने उजेड बघावा ही आस चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या वृद्धांची आहे. गावातील अंधारापेक्षाही लखमापूरातील शैक्षणिक काळोख अधिकच गडद असल्याची विदारक स्थिती गावात आहे. पहिली ते चौथी इयत्ता असलेल्या जि. प. शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत. त्यांना शिकवायला दोन शिक्षक. गावात मुलभुत सुविधांचा अभाव त्यात रोजगार नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना आश्रम शाळेत पाठविले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही विकास प्रवाहात आलेला नाही. आदिवासी,कोलाम बांधवांची मोठी संख्या असलेल्या या तालुक्‍याच्या विकासाकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे. तालुक्‍यातील लखमापूर या गावात मोबाईल पोहोचला मात्र वीज पोहोचली नसल्याची विदारक स्थिती आहे. गाव वसून सत्तर वर्ष झाले मात्र गावाने उजेड बघितला नाही. आम्ही अंधारात दिवसे काढलेत किमान पुढच्या पिढीला तरी उजेड द्या अशी आर्त हाक गावकरी शासनाला देत आहेत.

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?

गाव अंधारात बुडाले असताना गावाची शैक्षणिक स्थिती अधिकच बिकट आहे. लखमापूरात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता असलेली शाळा आहे. या शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत. या दोघांना शिकवायला दोन शिक्षक कार्यरत आहेत. शडमाराव कुंबरे हा विद्यार्थी इयत्ता तिसऱ्या वर्गात आहे तर रमेश कोटनाके हा चौथीत आहे. या दोघांना शिकवायला जीवन केंद्रे,धनराज यमुलवार हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. गावात कुटुंबे घर करुन आहेत. शेती हाच गावाचा मुख्य व्यवसाय. गावात मुलभुत सुविधा नाहीत त्यात मुबलक रोजगार नसल्याने गावातील पालकांनी आपल्या मुलांना भारी,टेकामांडवा,कोरपणा,देवाळा येथिल आश्रम शाळेत पाठविले आहे.

पाण्यासाठी पायपिट

गावात पाण्याची मोठीच टंचाई आहे. गावापासून साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या नाल्याला लागुन विहीर आहे. या विहीरीच्या पाण्यावरच गावकरी तहान भागवितात. मात्र त्यासाठी गावकऱ्यांना मोठीच पायपिट करावी लागते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No students in Lakhamapur school