esakal | आता तरी बरस बाबा! वर्धेकरांचे डोळे आभाळाकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

rainr

जून प्रमाणे जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी आहे. महिना संपण्यास दहा दिवस उरले असताना केवळ 63.19. टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात 321.63 मीमी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत केवळ 203 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

आता तरी बरस बाबा! वर्धेकरांचे डोळे आभाळाकडे!

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : पाऊस सुरू होऊन दोन महिन्याचा काळ होत आला. यंदा मान्सूनने जिल्ह्यात तारखेनुसार आगमन केले तरी जून महिन्यात पाऊस सरासरी पासून दूरच राहिला. जून महिन्यात साधारणत: 171.38 मीमी पाऊस अपेक्षित आहे. पण, यंदा जून महिन्यात 158.22 मीमी पावसाची नोंद झाली. यात सरासरी 13.16 मीमी म्हणजेच 7.68 टक्‍के पावसाची तूट झाली.

जून प्रमाणे जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी आहे. महिना संपण्यास दहा दिवस उरले असताना केवळ 63.19. टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात 321.63 मीमी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र आजपर्यंत केवळ 203 मीमी पावसाची नोंद झाली आहे. सध्याच्या तुलनेत अपेक्षित पावसाच्या तुलनेत 108.28 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दर महिन्याकाठी पावसात असलेली तूट सर्वसामान्यांची चिंता वाढविणारी आहे. वर्ध्यात साधारणत: पावसात तूट होत नाही. पण, यंदा पावसाची तूट सर्वांना पाण्याच्या बचतीचा संदेश देणारी ठरणार आहे.

गत वर्षीही जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण कमी होते. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरी 920 मीमी पावसाची अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. या काळात केवळ 361.47 मीमी पाऊस नोंदविला गेला. याची टक्‍केवारी 39.26 टक्‍के होती. यानंतर आलेल्या पावसाने वर्धेकरांना पाणीटंचाईच्या सावटातून सोडविले. पावसाचा काळ संपल्यानंतरही वर्ध्यात पाऊस आल्याने जिल्ह्यातील जलाशये ओसंडून वाहिली. यंदा तसे घडेल हे सांगणे सध्या तरी कठीण असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. पावसाच्या दिवसातच जर पाऊस थांबला तर येत्या दिवसात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
 

आर्वी, कारंजा वगळता इतर तालुके सरासरीपासून दूर
जून महिन्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असले तरी आर्वी आणि कारंजा तालुक्‍याने मात्र सरासरी पार केली. आर्वीत 154.10 मीमी पाऊस अपेक्षित असताना 173.45 मीमी म्हणजेच 112.56 टक्‍के पावसाची नोंद झाली. कारंजा तालुक्‍यात 171.60 मीमी पाऊस अपेक्षित होता. पण, 230.78 मीमी म्हणजेच 134.49 टक्‍के पाऊस आला. हे दोन तालुके वगळता इतर ठिकाणी मात्र पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाचा - आजपासून या गावांमध्ये आठ दिवस कम्प्लिट लॉकडाउन!

तालुकानिहाय झालेला पाऊस (टक्‍क्‍यांत)
          तालुका                        जून                                                                   जुलै (आजपर्यंत)

  • वर्धा                        71.6                                                                   65.91
  • सेलू                       83.41                                                                  79.15
  • देवळी                    98.19                                                                 60.71
  • हिंगणघाट             79.10                                                                 71.34
  • समुद्रपूर                67.88                                                                 35.15
  • आर्वी                   112.56                                                                59.10
  • आष्टी                   93.33                                                                66.90
  • कारंजा               134.49                                                                70.84

दोन मध्यम प्रकल्पात शंभर टक्‍के जलसाठा
जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या पावसात दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्‍के भरले आहेत. या डोंगरगाव आणि कारनदी प्रकल्पाचा समावेश आहे. तर इतर प्रकल्पात अद्यापही 50 ते 70 टक्‍के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या 20 लघू प्रकल्पापैकी दहेगाव (गोंडी) प्रकल्प शंभर टक्‍के भरला आहे. तर कन्नमवार ग्रामप्रकल्प 80 टक्‍क्‍यांच्यावर भरला आहे. इतर प्रकल्पात 21 ते 78 टक्‍क्‍यांच्या आसपास पाणी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


संपादन - स्वाती हुद्दार