ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी हाहाकार; नळयोजनेची पाइपलाइन ठरली कुचकामी

चित्रा कापसे
सोमवार, 25 मे 2020

पाणीपुरवठा योजनेला युद्ध पातळीवर सुरुवात झाली खरी; पण दोन वर्षे लोटूनही  या योजनेचे काम अजूनही सुरूच आहे. नळधारकांच्या घरी नवीन योजनेअंतर्गत नळाची लाइन जोडून झालेली आहे. पाण्याच्या टाक्‍या  उभ्या आहेत. पाइपलाइनचे काम बहुतांशी झालेले आहे. परंतु नवीन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू व्हायला वेळ आहे.

तिरोडा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण उपविभाग क्रमांक 1 गोंदिया शाखा तिरोडाअंतर्गत तिरोडा नगर परिषद हद्दीतील भागात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु दरवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. टिल्लूपंप लावून अनेकजण अडचण निर्माण करीत आहेत.
तिरोडा शहरातील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांनी महाराष्ट्र शासनाकडून मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात 2018 मध्ये 27 कोटी रुपयांची तिरोडा शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर केली. पाणीपुरवठा योजनेला युद्ध पातळीवर सुरुवात झाली खरी; पण दोन वर्षे लोटूनही  या योजनेचे काम अजूनही सुरूच आहे. नळधारकांच्या घरी नवीन योजनेअंतर्गत नळाची लाइन जोडून झालेली आहे. पाण्याच्या टाक्‍या  उभ्या आहेत. पाइपलाइनचे काम बहुतांशी झालेले आहे. परंतु नवीन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू व्हायला वेळ आहे.
शहरातील लोकांना जुन्या पाइपलाइनमधून पाणी न मिळण्याची कारणेही अनेक आहेत. एकीकडे शहरातील अनेक भागातील लोक पिण्याच्या पाण्याच्या नळाला टिल्लूपंप लावून नळाचे पाणी वापरतात; तर दुसरीकडे अनेक लोकांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याने ओरड आहे. जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता गौरव सोनवाने यांच्याकडे टिल्लूपंप लावणाऱ्यांची तक्रार केली असता, आमच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे टिल्लूपंप लावणाऱ्यांना पकडण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे अनेकदा नळाला गढूळ पाणी येत असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. पिण्याचे पाणी नळाला येत नसल्याने तिरोड्यातील "आर ओ'चे पाणी विकणारे मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.
पिण्याच्या पाण्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडे घेऊन गेल्यास "बस कुछ ही दिन की बात है, थोडा सब्र करो, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. याविषयीची दाद नागरिकांनी मागावी कोणाला, हा यक्ष प्रश्न पडलेला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग याबाबतीत जुन्या पाइपलाइनची क्षमता तेवढी नसल्याचे सांगत आपले हात वर करीत आहेत.

सविस्तर वाचा - वस्त्रनिर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला
कारवाई होणार
हुतात्मा स्मारकाजवळून एका गल्लीत पी. व्ही. सी. 75 एमएमचा पाइप गेलेला आहे. त्यामुळे जेवढे पाणी इतर ठिकाणी जायला पाहिजे तेवढे पाणी उन्हाळ्यात जात नसल्याने ही अडचण येते. टिल्लूपंप लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
 गौरव सोनवाने, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना, तिरोडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No water in summer