दुधविक्री करून मुलाला बनविले पीएसआय, ही संघर्षगाथा वाचाच

bhojram
bhojram

जेवणाळा : छोट्याशा मऱ्हेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी व दूधाचा व्यवसाय करणारे शामराव लांजेवार यांच्या मुलाने स्वअध्ययनातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. प्रसंगी शेती व बांधकामावर मजूरीने जाणारा भोजराम आता पोलिस उपनिरीक्षक म्हणून दिसणार आहे. याबद्दल त्याचे परिसरात कौतुक होत आहे.
लाखनी तालुक्‍यातील मऱ्हेगाव येथील भोजराम लांजेवार याने गावातच आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर चार किलोमीटर अंतरावरील पालांदूर येथे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने फावल्या वेळात वडीलांसोबत शेतीच्या कामाकडेही लक्ष दिले. रामटेक येथील शासकीय नागरिक अध्यापक विद्यालयात डीएड पूर्ण केले. नंतर मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शेती काम करीत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यादरम्यान शेतावरील पेरू विकणे, घर बांधकामाची कामे तो करत होता. सोबतच त्याने वाकल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मंडळ कार्यवाह म्हणून कार्य केले आहे.
स्पर्धा परीक्षेत पहिली परीक्षा 2017 ला दिली. परंतु, गुण कमी मिळाल्याने मुख्य परीक्षेला अपात्र ठरला. पण अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. 2018 ला लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातून ओबीसी प्रवर्गातून विसावा आला. संपूर्ण राज्यातून त्याने 165 वा क्रमांक मिळविला.

विशेष म्हणजे भोजरामने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग न लावता हे यश संपादन केले आहे. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देणारे कार्य केले आहे. भोजरामच्या वडीलांची दीड एकर शेती असून ते म्हशी राखतात. त्यांच्याकडे दूधाचा व्यवसाय आहे. आई शेती व घरचे काम सांभाळते. त्याला एक लहान भाऊ आहे.

भोजरामच्या या यशामुळे मऱ्हेगाव परिसरात युवकांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी व स्वयं अध्ययनातून कोणताही खर्च न करता आपल्या परिश्रमातून यश मिळवता येते, हेच त्याने इतरांना दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल भोजरामच्या आईवडिलांनी त्याला पेढा भरवून आपला आनंद व्यक्त केला. परिसरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com