esakal | विदर्भातील 34 उमेदवार शर्यतीतून बाद
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विदर्भातील 34 उमेदवार शर्यतीतून बाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले.
विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि वर्धा मतदारसंघांमध्ये सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या सात मतदारसंघांमध्ये एकूण 181 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज, सोमवारी सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्जांच्या छाननीनंतर 21 पैकी 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज अर्जांच्या छाननीनंतर एकाही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात 11 उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. येथे 34 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जात त्रुटी व राजकीय पक्षांचे एबी फॉर्म सादर न केल्याने हे अर्ज अवैध ठरले. यात विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आदींचा समावेश आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात छाननीअंती 10 पैकी 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
नागपूर लोकसभा मतदारसंघात सहा तर रामटेकमध्ये 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी 37 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज अर्जांची छाननी झाल्यानंतर यातील सहा उमेदवारांचे अर्ज अस्वीकृत झाले. अर्ज मागे घेण्याची तारीख 28 मार्च असून 29 मार्च रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.
अकोला, अमरावती, बुलडाण्यात आज छाननी
अकोला, बुलडाणा आणि वाशीम मतदारसंघांत 18 एप्रिलला मतदान होणार असल्याने आज, मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तीनही मतदारसंघांमध्ये एकूण 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात अकोला 16, अमरावती 36 आणि बुलडाण्यात एकूण 15 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले. येथे उद्या, बुधवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

loading image