पीकविमा कंपन्या करताहेत असहकार्य; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कामठी तहसीलदारांना निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पीकविम्याचा नुकसानग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार व्हावा,  नुकसानग्रस्त शेती परिस्थितीची पाहणी करून पिकाचे सर्वेक्षण करावे.

कामठी, (जि. नागपूर) : परतीच्या पावसामुळे धानपिकाचे अतोनात नुकसान झाले. कृषी विभागाने पंचानामा केला. राज्यपालांनी मदत जाहीर केली. मात्र, या पिकांचा विमा काढला असताना विमा कंपन्या नुकसानभरपाई देण्यास असहकार्य करीत आहेत. यामुळे विमा कंपन्यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार देवराव रडके यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले. 

कामठी तालुक्‍यातील नेरी, उनगाव गावातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजना काढला असून ज्याची यादी सेंटल बॅंक ऑफ इंडिया गुंमथळा व पंजाब नॅशनल बॅंक कापसी येथे उपलब्ध आहे. तेव्हा काढलेल्या या पीकविम्याचा नुकसानग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी बजाज एलयांस इंशुरेन्स कंपनीचा काढलेल्या बॅंक प्रतिनिधीने नेरी उनगाव भागातील नुकसानग्रस्त शेती परिस्थितीची पाहणी करून पिकाचे सर्वेक्षण करावे व नुकसांनग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तहसीलदार अरविंद हिंगे यांना माजी आमदार देवराव रडके, नेरीचे माजी सरपंच डुंमदेव नाटकर, सरपंच अरुण आखरे, मुरलीधर झोड, राजहंस वंजारी, कैलास वंजारी, उमेश वंजारी, भोजराज झोड, देवराव चकोले, सोपान वंजारी, कुसुम पाटील, राधेश्‍याम पाटील, देवीदास झोड, रमेश झोड, शरद वाघमारे, लक्ष्मण नाटकर, धर्मराज चकोले, मंगेश चकोले, अंकुश नाटकर, चंद्रशेखर नाटकर, हरिभाऊ चकोले, रामभाऊ चकोले, काशीनाथ ठोंबरे, पंढरी वानखेडे यांनी दिले. 

शेतकऱ्यांवर संकट कोसळले
तालुक्‍यातील धान उत्पादकांचे पीक हाताशी आलेले होते. खर्च बराच झाला असला तरी यावर्षी धान चांगले बहरले. धानाला लोंब लागून त्यातील दानेही भरली होती. काहींचे पीक हिरवेगच्च होते. तर काहींना एक दोन आठवड्यात कापणी करायची वेळ आली होती. मात्र, धानाचे पीक परतीच्या पावसात स्वाहा झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. ओल्या दुष्काळाचे सावट पसरले असून मदतीची हाक शेतकरी देत आहे. तालुक्‍यातील वडोदा, गुमथळा, आजनी, गादा, नेरी, भूगाव परिसरातील सेलो, खेडी, परसोडी, तरोडी, शिवणी, झरप, चिखली, केसोरी, निंबा, वरंभा, अंबाडी, आडका, केम, कडोली, सोनेगाव, उनगाव, भोवरी गावांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

उत्पादनात घट होण्याची शक्‍यता
हलक्‍या धानाच्या कडपांवर पाणी गेल्याने कडपा फेरण्याच्या कामात शेतकरी कुटुंबासह शेतात राबत होता. अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीपोटी कापणी केलेल्या धानाची मळणी करण्याच्या कामाला गतीही दिली. दररोज कुठे ना कुठे पावसाची तुरळक हजेरी असल्याने धान काळे पडले आहे. उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. भारी धानपिकालाही फटका बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-cooperation of the crop insurance company