नवी उमेद! आठ तालुक्‍यातील ३२० गावांत होणार विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन

रूपेश खैरी
Wednesday, 12 August 2020

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्‍यात ३२० गावांत वैयक्तिक आणि सामूहिक परसबागेची निर्मिती झाली आहे. या परसबागांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या बचत गटांना आणि ग्रामपंचायतींना बियाण्यांच्या दहा हजार किटचे वितरण करण्यात आले आहे

वर्धा : गावागावांतील पोषण सुरक्षा टिकावी, सर्वांना विषमुक्‍त भाजीपाला मिळावा याकरिता उमेद प्रकल्पांतर्गत माझी परसबाग अभियान राबविण्यात आले. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अभियानात बियाण्यांच्या कीट वितरित करण्यात आल्या. यात एका परसबागेत भाजीपाल्याच्या २० वाणांचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्‍यात ३२० गावांत वैयक्तिक आणि सामूहिक परसबागेची निर्मिती झाली आहे. या परसबागांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या बचत गटांना आणि ग्रामपंचायतींना बियाण्यांच्या दहा हजार किटचे वितरण करण्यात आले आहे. या बियाण्यांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंद-मुळे आणि वेल- शेंगा अशा चार गटातील भाज्यांचे बियाणे देण्यात आले आहे. सेंद्रीय पद्धतीने उगविण्यात येत असलेल्या या भाजीपाल्याच्या वापराने गावकऱ्यांच्या आरोग्यावर उत्तम परिणाम होईल असे अपेक्षित आहे.

या कार्यक्रमात सहभागी असलेले जिल्हा, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, कृषी सखी, परिसर प्रशिक्षण समन्वयक, परिसर कृषी व्यवस्थापक आणि गाव साधन व्यक्ती यांचे रीतसरपणे प्रशिक्षण झाले आहे. कार्यक्रमात सहभागी असलेल्या महिलांचेसुद्धा गाव स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले. परस बागांमध्ये कोणतेही रासायनिक खत आणि औषधी वापरू नये यासाठी सर्व लाभार्थ्यांना सेंद्रीय जीवामृत, निमार्क आणि निंबोळी अर्क कसे बनवावे आणि वापरावे याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

भाजीपाल्याच्या वापरापूर्वी आणि नंतर हिमाग्लोबीन तपासणी
राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा प्रभाव मोजण्यासाठी सहभागी महिलांचे हिमोग्लोबिन परसबागेतील भाजीपाल्याचे सेवन सुरू होण्यापूर्वी तसेच पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये तपासण्यात येणार आहे. त्याचे विश्‍लेषण सुद्धा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कोण्या भाजीपाल्याचे किती सेवन होणार आहे आणि ते किती किमतीचे असणार आहे याची सुद्धा पूर्ण माहिती ठेवली जाऊन अभ्यास करण्यात येणार आहे.

उमेद आणि समृद्धी अंतर्गत येणाऱ्या गावांना बियाणे
उमेद अंतर्गत येणाऱ्या गावांना नऊ हजार कीट, यवतमाळ येथील इशा फाउंडेशनला चारशे कीट, यवतमाळ येथील सहारा संस्थेला तीनशे कीट आणि मिशन समृद्धी येणाऱ्या गावासाठी दोनशे कीटचे वितरण करण्यात आले. बियाण्यामध्ये पालेभाज्या वर्गीय, फळभाज्या वर्गीय, कंद-मुळे वर्गीय आणि वेल- शेंगा वर्गीय अशा चार गटातील २० भाजीपाल्याच्या बियाण्याचा समावेश आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-toxic vegetables experiment in Wardha district