esakal | कौशल्य विकासात दिखावाच जास्त, काम कमी : आमदार रोहित पवार 
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

कौशल्य विकासात दिखावाच जास्त, काम कमी : आमदार रोहित पवार 

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्‍व आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये याबाबत काम कमी आणि दिखावाच जास्त झाला. आता याउलट काम करावे लागेल. कामही करावे लागेल आणि त्याचा गाजावाजाही. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. उद्याचा काळ निश्‍चितच बदलेला असेल, असे आशावादी विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अकोला येथे व्यक्त केले. 

अमरावती येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर शेगावकडे जाताना अकोला येथे कार्यकर्त्यांची भेट आणि पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. युवकांच्या प्रश्‍नांवर काम करण्यासाठी रोहित पवार एक अजेंडा घेवून पुढे जात आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असताना पक्षाच्या स्तरावर युवकांना ताकद देणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात होतकरू युवा कार्यकर्ते व महिलांना संधी देण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा बदल बघावयास मिळेल. त्यामुळे उद्याचा काळ बदलेला तुम्ही पाहाल, असेही ते पुढे म्हणाले. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आहे ते रोजगार टिकले पाहिजे आणि नवीन रोजगार निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रा बाहेर उद्योग चालले आहे, ते आधी थांबवावे लागतील. त्यांना यापूर्वीच्या सरकारने विश्‍वासात घेतले नाही. त्यांचे परवाने, जमिनी यासह उद्योग टिकले व वाढले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पुढाकार घेवून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, असे पवार म्हणाले. यापूर्वीच्या सरकारने कौशल्य विकासात काम कमी आणि दिखावा जास्त केला. रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व लक्षात घेता त्यावर मोठे काम करावे लागणार आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, ॲड. अनंतराव खेडकर, डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आदींची उपस्थिती होती. 

महत्त्वाचे ः युवक काँग्रेसचे सुपर 60 नंतर सुपर 1000


आमदार म्हणूनच ताकद मोठी
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी असताना ती का स्वीकारली नाही, या प्रश्‍नला उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी आमदारकीची ताकद मोठी असल्याचे सांगितले. आज आमदार म्हणून कुणाचेही प्रश्‍न मांडून ते सोडवून घेण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. 


शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी लागेल
दिल्ली आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत फरक आहे. पूर्वी दिल्लीत शिक्षकांसोबत कुणाचाही संवाद नव्हता. ‘आप’चे सरकार आल्यानंतर त्यांनी शिक्षणातील गुंतवणूक वाढविली. ‘ट्रेन टू ट्रेनर’ ही संकल्पना राबवून काही शिक्षकांना विदेशात पाठविले. त्यांनी दिल्लीत शिक्षकांना त्यादृष्टीने तयार केले. शाळांमधील भौतिक सुविधा वाढविल्या. ‘ॲक्टिव्ह बेस लर्निंग’मध्ये महाराष्ट्र कमी पडू नये. त्यासाठी शिक्षकांना विश्‍वासात घेवून बदल करावा लागेल, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा ः लोणार येथे पक्षीमित्र संमेलन


विकास करीत असताना राजकारण बाजूला!
राज्याला सकारात्मक राजकारणाची गरज आहे. विकास करीत असताना राजकारण बाजूला ठेवूनची मी काम करतो. राजकारणात मला काही तरी सकारात्मक करून दाखवयाचे आहे. त्यामुळेच सोयीच्या मतदारसंघा ऐवजी, संधी असलेला मतदारसंघ निवडला. लोकांमध्ये विश्‍वास निर्माण केला. या विश्‍वासाच्या बळावरच आमदार झालो. ते तो टिकविण्यासाठी काम करीत राहील, असे आमदार रोहित पवार म्हणाले. 


सहज बोलून गेलेल्या गोष्टीला गांभिर्य नाही
महाविकास आघाडीचे सरकार ठरलेल्या अजेंड्यावर चालावे, असे मत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी व्यक्त केले. त्यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी सहज बोलून गेलेल्या गोष्टीला गांभिर्याने घेवू नये, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वासही त्यांनी दर्शविला. 

loading image