esakal | दिग्रस तालुक्‍यात बनावट नोटा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दिग्रस तालुक्‍यात बनावट नोटा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस, (यवतमाळ) : तालुक्‍यातील आरंभी येथील एका घरातून पोलिसांच्या झडतीत शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. हा प्रकार शुक्रवारी उजेडात आला. बनावट नोटाप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
आरंभी येथे बनावट नोटा असल्याची पोलिसांना गुप्तसूत्रांनी दिली. माहिती मिळताच दिग्रस पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक विनायक जाधव, डीबी पथकाचे नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, धम्मानंद केवटे, मनोज चव्हाण, दीपक ढगे व सरस्वती मुळे यांनी आरंभी गाठून आरोपी शंकर साजू पवार (वय 39) रा. आरंभी याची चौकशी केली. त्यानंतर घराची झडती घेतली असता घरातील एका पांढऱ्या रंगाच्या डब्यात शंभर रुपयांच्या 253 बनावट कोऱ्या करकरीत अशा एकूण 25 हजार 300 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा चलनात आणण्यासाठी आरोपी नितेश जानूसिंग राठोड (वय 24, रा. धुंदी, ता. पुसद) याला पोलिसांनी रात्रीला धुंदी येथून ताब्यात घेतले. तर आरोपी धीरजसिंह बंडुसिंह गौतम (ठाकूर) (रा. धुंदी, ता. पुसद) हा फरार आहे. या बनावट नोटा चलनात येत असल्याने यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. फरार आरोपी धीरजसिंह गौतम याची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले करीत आहेत.

पाच दिवसांची पोलिस कोठडी
दिग्रस पोलिसांनी दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पोलिस कोठडीदरम्यान बनावट नोटा प्रकरणात आणखी आरोपींची वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे. नकली नोटा कोठून आल्या आणि अशा आणखी नकली नोटा बाजारात आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

loading image
go to top