भिक्षेकरी झाले हायटेक; सोशल मीडिया व ऑनलाईन पेमेंट ॲप वापरणाऱ्यांना करतात टर्गेट, वाचा संपूर्ण प्रकार

मिलिंद उमरे
Friday, 7 August 2020

कधीतर मोबाईल रिचार्ज मारून द्या म्हणून गळ घालतात. त्यामुळे एखादी व्यक्ती खरच गरज असेल म्हणून ही रक्‍कम देऊन देते. पण, या चतूर व्यक्ती अशाच प्रकारे इतर व्यक्तींवरही जाळे टाकतात. कधी त्यांच्या भावनेला हात घालतात, कधी भावनिक दबाव आणतात. हे प्रकार साधरणत: रात्री उशिरा किंवा संबंधित व्यक्ती व्यस्त असेल, अशा वेळेस केले जातात.

गडचिरोली : तुम्ही एखाद्या दिवशी फेसबुक किंवा मॅसेंजरच्या इनबॉक्‍समध्ये एखाद्या व्यक्तीचा मेसेज बघता. ही व्यक्ती कधी तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असते किंवा कधी नसतेही. ती तुमचं कौतुक करते. चार दिवस छान बोलते. गुड मॉर्निंग व गुड नाइटचे मेसेज पाठवते. एक दिवस काहीतरी जबरदस्त गंभीर कारण सांगून पैशांची मागणी करते. हा अनुभव तुम्हालाही आला असेल. हा असा ऑनलाइन भीक मागण्याचा फंडा समाजातील काही ऐतखाऊ व्यक्ती वापरत असून इतर त्रस्त होत आहेत.

समाजात अशा व्यक्ती नेहमीच असतात ज्यांना काहीही काम न करता पैसे हवे असतात. त्यासाठी ते नवनव्या शक्‍कली लढवत असतात. कोणतेतरी कारण सांगून उधार मागणारे आपल्या आजूबाजूला नेहमी दिसतात. काहींनी आता अशाच प्रकारे उसणवारी किंवा भीक मागण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे.

कसं काय बुवा? - घरच्या कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक रडत होते ढसा ढसा, डॉक्टरांनी दिली रुग्ण जिवंत असल्याची बातमी, वाचा संपूर्ण प्रकार...

फेसबुक, व्हॉस्ट्‌सऍप, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दूरवरच्या व्यक्तींच्या पोस्टचे कौतुक करायचे, काही दिवस छान मैत्री करायची मग, एक दिवस आपली आई आजारी आहे, मुलगा आजारी आहे किंवा मला कॉलेजचे प्रवेश शुल्क भरायचे आहे, तर कधी मी मुलाखतीसाठी बाहेरगावी आलो, पाकीट हरवले, असे बहाणे सांगून पैशांची मागणी करतात. ही मागणीही फार मोठ्या रकमेची नसते. अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची असते.

कधीतर मोबाईल रिचार्ज मारून द्या म्हणून गळ घालतात. त्यामुळे एखादी व्यक्ती खरच गरज असेल म्हणून ही रक्‍कम देऊन देते. पण, या चतूर व्यक्ती अशाच प्रकारे इतर व्यक्तींवरही जाळे टाकतात. कधी त्यांच्या भावनेला हात घालतात, कधी भावनिक दबाव आणतात. हे प्रकार साधरणत: रात्री उशिरा किंवा संबंधित व्यक्ती व्यस्त असेल, अशा वेळेस केले जातात. कारण, त्यावेळेस त्यांच्याकडे विचार करायला फारसा वेळ नसतो.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार हिंदू विरोधी, कोणी केला हा आरोप, वाचा

ऍप्समळे लवकर देतात पैसे

आता पेटीएम, गुगल पे, फोन पे असे पैशांचे जलद व्यवहार करणारे ऍप्स हाताशी असल्याने पटकन पैसे दिले जातात. या व्यक्ती एकाच वेळेस अनेकांना असे मेसेज पाठवतात. दहापैकी दोन नक्‍कीच गळाला लागतील, हे त्यांना माहिती असते. एकदा पैसे मिळाले की, ते कधीच परत करीत नाही. एकतर रक्‍कम छोटी असते आणि ज्याला दिले तो दूर परिसरातला किंवा अगदीच अनोळखी असतो. त्यामुळे त्याचा पिच्छाही पुरवला जात नाही आणि पोलिसांत तक्रारही होत नाही. त्यामुळेच अशा भामट्यांची संख्या वाढत आहे.

सविस्तर वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत

खरे गरजवंत अडचणीत...

अशाप्रकारच्या ऑनलाइन भिकेच्या धंद्याला चटावलेल्या फुकट्यांमुळे खरे गरजवंत अडचणीत येत आहेत. अनेकदा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्ती नाइलाजाने किंवा समाजाकडून सहयोगाची अपेक्षा असल्याने भावनिक संदेशासह मदतीची मागणी करतात. ते खरोखरच गरजवंत असतात. पण, या प्रकारात आता खोटारडेपणा वाढल्याने एखाद्याला खरोखर गरज असतानाही मदत करणे टाळले जाते. अगदी ‘लांडगा आला रे आला' कथेसारखा प्रकार होत आहे.

संपादन - चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Beggars beg online