Video : आता जनावरांवर या रोगाने केले आक्रमण...पशुपालक शेतकरी झाले चिंतित

सुधाकर दुधे-देवा बावणे
Saturday, 8 August 2020

शेतीकामासाठी अनेक शेतकरी पशुपालन करीत आहेत. जनावरांची काळजी घेणे, बैलांची वापर शेतीसाठी करणे आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांनी जनावर पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र सध्या जनावरांच्या शरीरावर गाठी, शरीरावरील ग्रंथीला, पायाला, पोळीला सूज आदी सोबतच ताप, अशक्तपणा ही लक्षणे जनावरांत दिसून येत आहेत. त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत.

सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पशुधनावर "लंपी' (त्वचा रोग) या विषाणूजन्य साथीच्या रोगाने आक्रमण केले आहे. जवळपास पाचशे जनावरांना याची लागण झाली आहे. त्याळे पशुपालकांनी चिंता व्यक्त केली आहे. शेतीत रोवणीचे काम सुरू आहे. त्यातच या साथीच्या आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतीकामासाठी अनेक शेतकरी पशुपालन करीत आहेत. जनावरांची काळजी घेणे, बैलांची वापर शेतीसाठी करणे आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांनी जनावर पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र सध्या जनावरांच्या शरीरावर गाठी, शरीरावरील ग्रंथीला, पायाला, पोळीला सूज आदी सोबतच ताप, अशक्तपणा ही लक्षणे जनावरांत दिसून येत आहेत.

त्यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. सध्या रोवणीचा हंगाम असल्याने या कामासाठी बैलांची आवश्‍यकता भासत असते. मात्र बैलांना लंपी या रोगाने ग्रासल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

१४ रुग्णालयांत केवळ १२ पशुवैद्यकीय अधिकारी

सावली तालुक्‍यात १४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. श्रेणी एकमध्ये दोन, तर श्रेणी दोनमध्ये १२ रुग्णालये आहेत. ज्यामध्ये सावली, बोथली, पाथरी, पालेबारसा, उपरी, सामदा, केरोडा, व्याहाड बुज, चिचबोडी, विहरगाव, निमगाव, निफंद्रा, जिबगाव व लोंढोली आदी गावांचा यात समावेश आहे. मात्र १४ रुग्णालयांत केवळ १२ पशुवैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे जनावरांना तपासताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

असं घडलंच कसं : ...आणि पत्नीने पतीला लाकडी दांड्याने बदड बदड बदडले!

जनावरांना पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे

आधीच कोरोना रोगाची साथ आहे. त्यात "लंपी' ने जनावरांना फास आवळला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या आजाराबाबत शासनाचे पशुसंवर्धन विभाग सतर्क आहे. अनेक भागातील जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुपालकांनी जनावरांना अशी लक्षणे आढळल्यास त्वरित लगतच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके यांनी केले आहे.

जनावरांची काळजी घ्यावी
लंपी हा आजार तीन-चार दिवसांत बरा होतो. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. ज्या भागात लंपीची जास्त साथ आहे. त्या भागात फवारणी करण्यात येत आहे.
- डॉ. कन्नाके,
पशुधन विकास अधिकारी, सावली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the disease has attacked the animals