आता स्वच्छ कापसासाठी मिशन कॉटन

विनोद इंगोले
गुरुवार, 2 जानेवारी 2020

कापसातील काडीकचरा काढला जावा. त्यापासून भेसळमुक्‍त कापूसगाठ तयार व्हावी. अशा स्वच्छ कापूसगाठीच्या निर्यातीच्या बळावर भारतालाही दर्जेदार कापूस उत्पादकांच्या यादीत स्थान मिळावे, असे निर्मल कॉटन मिशनच्या अंमलबजावणीतून सरकारला अपेक्षित आहे. यापूर्वी टेक्‍नॉलॉजी मिशन ऑन कॉटन-1 आणि टेक्‍नॉलाजी मिशन ऑन कॉटन-2 असे टप्पे स्वच्छ कापूस उत्पादकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आले होते.

नागपूर : स्वच्छ प्रतिचा कापूस उत्पादक देश, अशी ओळख भारताला मिळावी, याकरिता देशात पाच वर्षे कालावधीसाठी निर्मल कॉटन मिशन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, मिशन सदस्यांची पहिली बैठक नुकतीच पार पडली. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 300 जिनिंग उद्योगांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

हे वाचाच - सुरू होेते जाम पे जाम; पळता पळता फुटला घाम

कापसातील काडीकचरा काढला जावा. त्यापासून भेसळमुक्‍त कापूसगाठ तयार व्हावी. अशा स्वच्छ कापूसगाठीच्या निर्यातीच्या बळावर भारतालाही दर्जेदार कापूस उत्पादकांच्या यादीत स्थान मिळावे, असे निर्मल कॉटन मिशनच्या अंमलबजावणीतून सरकारला अपेक्षित आहे. यापूर्वी टेक्‍नॉलॉजी मिशन ऑन कॉटन-1 आणि टेक्‍नॉलाजी मिशन ऑन कॉटन-2 असे टप्पे स्वच्छ कापूस उत्पादकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता निर्मल कॉटन मिशन राबविण्यात येत आहे. पाच वर्षांकरिता असलेल्या या मिशनसाठी पहिल्या टप्प्यात 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कापूसगाठीची शुद्धता जिनिंगस्तरावर तपासण्याची सोय या अभियानातून निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. कच्चा कापूस आणि प्रक्रियेदरम्यान त्यात राहणारा काडीकचरा, कागद, प्लॅस्टिक वेगळे करून शुद्ध प्रतिची गाठ तयार केली जाईल. अशा दर्जेदार कापूसगाठींची निर्यात झाल्यास त्याद्वारे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कापूस उत्पादकतेत नवी ओळख मिळण्यास मदत होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. देशातील निवडक जिनिंग उद्योगांना त्यासाठीची यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे मिशनअंतर्गत प्रस्तावित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मिशनवर विदर्भातून एकमेव प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने निर्मल कॉटन मिशन समितीचे गठण केले आहे. यामध्ये सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अली राणी अध्यक्ष आहेत. त्यासोबतच वस्त्रोद्योग सचिव अजित चव्हाण, वस्त्रोद्योग आयुक्‍त व्ही. के. कोहली, डॉ. के. सेल्वराजू, सुरेश कोटक, बी. के. पटोडीया, एस. श्रीनिवासन, सिरकॉटचे डॉ. पी. जी. पाटील, बेटर कॉटन इनिसेटिव्हचे अमित शहा यांच्यासह विदर्भातून प्रशांत मोहता यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश आहे.

सर्वप्रथम शुद्धता तपासणार

निर्मल कॉटन मिशनची बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीत निर्यातक्षम स्वच्छ कापूस उत्पादनाकरिता करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. त्यामध्ये जिनिंगस्तरावरच प्रत्येक कापूसगाठीची शुद्धता तपासण्यासंदर्भाने पहिल्या टप्प्यात काम करण्याचा निर्णय झाला.
-प्रशांत मोहता, सदस्य, निर्मल कॉटन मिशन, भारत सरकार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now mission cotton