वनगुन्हेगारांना आता ताडोबात प्रवेश बंदी! 

tadoba-safar
tadoba-safar

मोहर्ली (जि. चंद्रपूर) : वनगुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे दर्शन घेता येणार नाही. पर्यटनावर आधारित कोणतेही लाभ त्यांना घेता येणार नाही. ताडोबा व्यवस्थापनाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भविष्यात वनव्यवस्थापन आणि वनगुन्हेगार यांच्यात चांगलाच संघर्ष पेटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

वनजमिनीवर अतिक्रमण करणे, वन्यजीवांची शिकार किंवा त्यात सहभागी असणे, जंगलतोड करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्यांना आता ताडोबात प्रवेश दिला जाणार नाही. ताडोबा व्यवस्थापनाने अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना ताडोबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांची यादी बनविण्याचे काम आणि त्यांची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशा प्रकारचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाच्या अंगलट येऊ शकतो, हे काही दिवसांपूर्वी कोलारा गेटवरील जिप्सी चालकांनी दाखवून दिले. ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारानजीक काही लोकांनी वनजमीन अतिक्रमित केली आहे. यातील आठजण जिप्सीमालक आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते पर्यटकांना ताडोबात नेत आहेत. 

नवा वाद पेटण्याची शक्‍यता

मात्र आता वनगुन्हे आणि वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना ताडोबात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जिप्सी बंद केल्या जाणार आहेत. मागील आठवड्‌यात त्यांच्या जिप्सी अडविण्यात आल्या. तेव्हा कोलारा गेटवर तणाव निर्माण झाला होता. शेवटी पर्यटकांचा विचार करून या जिप्सी दोन तासांनी सोडण्यात आल्या. मात्र, आता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेकांचा रोजगारही जाऊ शकतो. मग त्यात वनमजूर, विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी असतील, या सर्वांना याची झळ बसणार आहे. 

वन्यजीवांची सुरक्षा महत्त्वाची

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार ओळख लपवून जंगलाचा आधार घेतात. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागू नयेत. वन्यजीवांना कोणताही फटका बसू नये यासाठी हे धोरण स्वीकारण्यात आले आहे, असे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ताडोबाच्या कोअर झोनमध्ये अजूनही काही गावे वसली आहेत. त्यांना बाहेर काढणं आणि वनजमीन मोकळी करणं, हा या मागील मुख्य उद्देश असल्याचेही बोलले जात आहे. ताडोबा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र आहे. वन्यजीवांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com