esakal | गोंदिया जिल्ह्यातील या गावात कधीतरी होती वसाहत आता मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

bhutbangala.

पाटबंधारे विभागाच्या उदासीन धोरणामुळे 49 वर्षे जुनी वसाहत आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधत असून, या वसाहतीला गतवैभव परत मिळावे, अशीच अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील या गावात कधीतरी होती वसाहत आता मात्र...

sakal_logo
By
जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) :  एकोणपन्नास वर्षांपूर्वी इथे कोणी राहायचे, यावर आज तरी विश्‍वास बसणे अशक्‍य आहे. कारण आता तिथे केवळ जंगली श्‍वापदांचा वावर आहे. 1971-72 मध्ये गौरीडोह तलावाची निर्मिती करतेवेळी येथे पाटबंधारे वसाहतीचे बांधकाम झाले. जवळपास 49 वर्षे झालीत. मात्र, या वसाहतीत आता केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य आहे. कोणताही कर्मचारी या वसाहतीत राहात नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून, ही वसाहत अस्तित्वाच्या खुणा शोधत आहे.

सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी येथे पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत एकूण सात क्‍वार्टर असून, येथे कालवा निरीक्षक, टेक्‍निकल असिस्टंट, इंजिनिअर, कारकून, मजूर, कालवा चौकीदार अशा विविध पदांवरील कर्मचारी पूर्वी वास्तव्यास असायचे. त्याव्यतिरिक्त गोदाम, कार्यालय या सारख्या वेगवेगळ्या इमारती आहेत.

येथून परिसरातील 9 मामा तलावांचा पूर्ण कारभार पूर्वी चालायचा आणि आजही चालतो. येथील बरीच पदे रिक्त असून, जे कार्यरत आहेत ते दूरवरून ये-जा करीत आहेत. त्यामुळे या निर्मनुष्य वसाहतींकडे दुर्लक्षच झाले आहे. वसाहतीच्या सभोवताल केरकचरा, झाडे, झुडपे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खिडक्‍या, दरवाजे तुटले आहेत. आता या वसाहतीत जंगली प्राण्यांनी बस्तान मांडल्याचे दिसून येते.

पाटबंधारे विभागाच्या उदासीन धोरणामुळे 49 वर्षे जुनी वसाहत आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधत असून, या वसाहतीला गतवैभव परत मिळावे, अशीच अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - ठकबाज प्रीती दास जेलमध्ये क्‍वारंटाईन

सौंदर्याला लागली दृष्ट
पूर्वी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत अधिकारी, कर्मचारी राहायचे. त्यामुळे देखभाल, दुरुस्ती नियमित केली जायची. त्यामुळे ही वसाहत देखणी, सुंदर होती. परंतु, सद्यःस्थितीत येथे कोणताही कर्मचारी राहात नसल्याने वसाहतीला भकास रूप आले आहे. जवळच नागझिरा अभयारण्य असल्याने निर्जन वसाहतीत जंगली प्राण्यांचा वावर दिसून येत आहे.