चामडी सोलली तरी चालेल... पण, तू ताप बाबा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

दरवर्षी हाहाकार माजविणारा उन्हाळा नकोच, अशी प्रतिक्रिया अकोलेकर देत असतात. मात्र सध्या ‘कोरोना व्हायरस’ मुळे एवढी भीती निर्माण केली आहे की, उष्ण वातावरणात तो नष्ट होत असल्यास, चामडी सोलली तरी चालेल पण, तिव्र ऊन तापले पाहिजे, अशी इच्छा अकोलेकर आता व्यक्त करीत आहेत.

अकोला : जगात सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. त्यामुळे दरवर्षी हाहाकार माजविणार उन्हाळा नकोच, अशी प्रतिक्रिया अकोलेकर देत असतात. मात्र सध्या ‘कोरोना व्हायरस’ मुळे एवढी भीती निर्माण केली आहे की, उष्ण वातावरणात तो नष्ट होत असल्यास, चामडी सोलली तरी चालेल पण, तिव्र ऊन तापले पाहिजे, अशी इच्छा अकोलेकर आता व्यक्त करीत आहेत.

उन्हाचे चटके, उष्ण झळा आणि तिव्र तापमानामुळे होणारी जिवाची लाहीलाही, यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा वाटतो. अकोल्यामध्ये दरवर्षी तापमान वाढीचा उच्चांक नोंदला जात आहे त्यामुळे उन्हाळा येऊच नये, अशा प्रतिक्रिया अकोलेकरांच्या तोंडून व्यक्त होत असतात. सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे परंतु, अजून पर्यंत अकोल्यात पारा 35 अंश सेल्सिअस पार गेलेला नाही. त्यामुळे अकोलेकरांनासाठी हे वातावरण दिलासाजनक असायला हवे होते. मात्र, या उलट प्रतिक्रिया अकोलेकरांकडून व्यक्त होत असून, चामडी सोलली तरी चालेल पण, उन्हाची तिव्रता वाढली पाहिजे, अशी इच्छा प्रकट केली जात आहे. त्याला कारण म्हणजे, चीनमधून जगभरात संक्रमण करीत असलेला कोरोना व्हायरस हा अधिक तापमानात टिकाव धरत नसल्याची चर्चा आहे. या व्हायरसच्या चपाट्यात अनेक देश सापडले असून, भारतातही या आजारांनी बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण सापडला नाही. परंतु, इतर जिल्ह्यातील व राज्यातील स्थिती पाहाता, हा व्हायरस अकोल्यात येऊच नये किंवा आल्यास, येथील वातावरणात टिकूच नये, यासाठी तिव्र उन्हाची प्रतीक्षा अकोलेकर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now people say temperatures must rise