esakal | अबब! दहा फुटांची उदबत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

अबब! दहा फुटांची उदबत्ती

sakal_logo
By
राजेश रामपूरकर ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः सुवासिक उदबत्ती आणि धुपाच्या दरवळाशिवाय धार्मिक कार्य किंवा पूजा पूर्ण होऊ शकत नाही. पूजेच्या वेळी फुलांबरोबरच उदबत्ती, धूप, कापूर प्रज्वलित करण्यात येते. हे लक्षात घेऊनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा प्रथमच दहा फूट लांब उदबत्ती बाजारात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी उदबत्ती असल्याचा दावा केला आहे. गतवर्षी आणलेली आठ फुटांची उदबत्ती जामसावळी, वाकी उर्ससाठी गेली होती. यंदा अजरमेर शरीफ आणि बगदाद येथेही दहा फुटांची अगरबत्ती जाणार आहे.

घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपातही पूजा व आरतीच्या वेळेस उदबत्ती, धूप व कापूर यांचा वापर केला जातो. घरगुती गणपतीच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वस्तूंची अधिक प्रमाणात आणि संख्येत आवश्‍यकता असते. अत्तर ओळ, महाल, इतवारी, सक्करदरा, खामला, धरमपेठ येथील किरकोळ व घाऊक बाजारांत प्रामुख्याने हे व्यवसाय थाटले आहेत. गणपतीमध्ये किमान दोन ते अडीच फुटांपासून ते पाच किंवा त्यापुढे अगरबत्ती बाजारात विक्रीसाठी येतात. या उदबत्त्या चार, आठ किंवा दहा-बारा तास जळतात. गणेशभक्‍तांच्या मागणीनुसार यावर्षी दहा फूट लांबीची उदबत्ती बाजारात आणली आहे. त्याची किंमत पाच हजार रुपये असून यासाठी दीड ते दोन किलो सेंट वापरण्यात आला आहे. या उदबत्तीला एकदा काडी लावल्यानंतर गणेशोत्सव मंडपात त्याचा सुगंध चार ते पाच दिवस दरवळणार आहे.

घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून या दीर्घकाळ चालणाऱ्या उदबत्त्यांना चांगली मागणी आहे. यात मसाला आणि सेंटेड अशा दोन प्रकारांत उदबत्त्या येतात. गणेशोत्सवासाठी भाविकांकडून मसाला प्रकारच्या उदबत्त्यांना जास्त मागणी असते. चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, चाफा, वाळा, धूप असे विविध प्रकार यात मिळतात. मसाला उदबत्तीची किंमत सेंटेड उदबत्तीच्या तुलनेत जास्त असते. महागाईचा परिणाम उदबत्तीवर झाला असला तरी भाववाढ झाली असे म्हणाता येणार नाही.
- मोहम्मद रसिद शेख
संचालक, सरताज सुगंध अगरबत्ती

loading image
go to top