धक्कादायक! मातामृत्यूंमध्ये मेळघाट आघाडीवर; मानव विकास शिबिर राबवूनसुद्धा स्थिती जैसे थे

number of deaths of woman is more in Melghat
number of deaths of woman is more in Melghat

अचलपूर, (जि. अमरावती) ः गर्भवती महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, यामध्ये माहेरघर आणि मानव विकास शिबिर या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे. तरीसुद्धा मेळघाटात दरवर्षी मातामृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीदेखील ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत सहा मातामृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सोबतच जन्म होताच पहिल्या काही मिनिटांतच मेळघाटात बालके दगावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील सहा महिन्यांत जवळपास 51 उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मेळघाटात दरवर्षी आरोग्य विभाग तथा बालविकास विभाग करोडो रुपये खर्च करतात. तरीसुद्धा मेळघाटात अनेक बालके आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच अखेरचा श्‍वास घेत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे उपजत मृत्यू कमी करण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी निओनॉटॉलॉजिष्ट तज्ज्ञांची समिती नेमली होती. मात्र पुढे त्या समितीचे काय झाले? कोणालाही माहीत नाही. 

महत्त्वाची बाब म्हणजे मेळघाटातील बाल, मातामृत्यू कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून मानव विकास शिबिरे राबविण्यात येत आहेत. मात्र या शिबिरांचाही कोणताच लाभ गर्भवती महिलांना होताना दिसत नाही. आजही मेळघाटच्या अतिदुर्गम भागात गरोदर महिलांची बालविकास विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घरीच प्रसूती होतात. प्रसूती घरी झाल्यानंतरही ती आरोग्यकेंद्रात नोंदविली जात असल्याची माहिती प्राथमिक आरोग्यकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या व सांगण्याच्या अटीवर दिली. यावरून आजही मेळघाटात कागदोपत्री सर्व कामे केली जात असल्याचे दिसून येत आहे.

खापर आरोग्य विभागावर

उपजत तथा मातामृत्यूचे प्रमाण कमी न होण्यास आयसिडीयस विभाग कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पोषक आहार मिळत नसल्याने कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाणसुद्धा अधिक असते, असेही तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. तरीदेखील त्याचे खापर आरोग्य विभागावरच फोडण्यात येते.

मेळघाटातील होणारे उपजत तथा मातामृत्यू चिंतेची बाब आहे. योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने आज हे मृत्यू होत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आयसिडीयस व आरोग्य विभागाने समन्वय ठेवून काम करण्याची गरज आहे.
-राम फड, 
व्यवस्थापक, मैत्री संस्था.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com