
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. तालुक्यात बाहेरून आलेले व कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या केंद्रात विलगीकरणात ठेवले जाते.
मोहाडी (जि. भंडारा) : येथील माविमच्या आवारात कोरोनाबाधितांसाठी क्वारंटाइन सेंटर निर्माण केले आहे. वादळासह आलेल्या पावसात या केंद्रातील तंबू बुधवारी महिलेच्या अंगावर कोसळला. यात सुमित्रा बोरकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या केंद्राची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचे सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. तालुक्यात बाहेरून आलेले व कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या केंद्रात विलगीकरणात ठेवले जाते. तसेच जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र येथून दिले जाते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची येथे ये-जा सुरू असते. येथे रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर व परिचारिकांना थांबण्यासाठी आधी एक स्वतंत्र खोली दिली होती. मात्र, नंतर ती खोली खाली करण्यात आली. पाच दिवसांपूर्वीच संदर्भिय रुग्णांची तपासणी व प्रमाणपत्र देण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून तंबू तयार करण्यात आला.
अवश्य वाचा- विदर्भात कोरोनाने वाढविली धाकधूक; दोनशेवर रुग्णांचा मृत्यू
बुधवारी दिवसा पावसाची उघडीप सुरू असल्याने येथील विलगीकरण केंद्रात आलेल्या सुमित्रा बोरकर पावसात भिजल्या. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी त्या तंबूमध्ये शिरल्या. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा तंबू कोसळला. यात श्रीमती बोरकर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्या खाली कोसळल्या. उपस्थितांनी त्यांना उचलून प्राथमिक उपचार केले.
अवश्य वाचा- पहिले मुलं, नंतर खासदार आता आमदार; राणा कुटुंबीयच कोरोनाबाधित
या घटनेची माहिती तहसीलदार बोंबुर्डे यांना देण्यात आली. या घटनेमुळे डॉक्टर व परिचारिकांना धावपळ करावी लागली. तंबू कोसळल्यावर या केंद्रात पर्यायी व्यवस्था नसल्याने डॉक्टर, नर्स व नागरिकांना पाण्यात ओलेचिंब व्हावे लागले. या केंद्रात सेवा देणारे कर्मचारी त्रासले असून त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर