अहो आश्‍चर्यम! वाशीमच्या नवदाम्पत्यांनी वाचविले 90 कोटी

 Oh wonder! Washim's newlyweds save Rs 90 crore
Oh wonder! Washim's newlyweds save Rs 90 crore

वाशीम : घर पाहावे बांधून आणि लग्न पहावे करून, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची पुंजी लग्नाच्या डामडौलात खर्च होते. दरवर्षी एकाएका गावातून लाखो रुपये जेवणावळी, वाजंत्री, फटाके, वाहने, दागदागिने यावर उधळले जातात. मात्र, एकट्या वाशीम जिल्ह्यात नवदाम्पत्यांनी तब्बल आत्तापर्यंत तब्बल 90 कोटी रुपये लॉकडाऊनच्याकाळात वाचविले आहेत. 


लग्न म्हटले की, वधूपिता व वरपित्यालाही खर्चाची तजवीज करावीच लागते. एका लग्नाला सरासरी दहा लाख रुपये खर्च येतो. कायद्याने हुंडा घेणे अपराध असला तरी, वराच्या परिस्थितीवरून हुंड्याचे आकडे अर्धाकोटींच्या जवळपास जातात. वधूपित्याला हुंड्याबरोबरच वाजंत्री, जेवनावळी, दागदागिने, आहेर, मानपान, बस्ता, मंडप- बिछायत, रोषणाई यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.

सामाजिक जाणीवा समाजमाध्यमांवर खर्च कमी करण्याचे आवाहन करीत असल्या तरीही दिवसेंदिवस हा खर्च वाढतच जातो. मात्र, कोरोनामुळे सर्वच व्यवहारांची गणिते बिघडली आहेत. शहरीभागातील उद्योग व्यवसाय ठप्प झालेत. रोजगारांना रोजगार नाही. या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात मात्र, प्रत्येक गावाने किमान दहा लाख रुपये तरी वाचविले आहेत. संचारबंदीच्या नियमांमुळे लग्न व तत्सम कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार्‍या संख्येवर मर्यादा आल्यात. मात्र, लग्नाळू मुला-मुलींचे लग्न तर जमली तरीही बँड, बाजा, बारात नियमबाह्य ठरल्याने केवळ पाच जणांत लग्न उरकले गेले.

वाशीम जिल्ह्यामध्ये 789 गावे आहेत. प्रत्येक गावामध्ये सरासरी लग्नासाठी होणारा दहा लाखांचा खर्च जमेस धरला तर या नवदाम्पत्यांच्या लगीनघाईने जिल्ह्यामध्ये तब्बल 90 कोटी रुपये वाचले आहेत. हे न दिसणारे पॅकेज असल्याने वायफळ होणारा खर्च थांबला आहे. बडेजाव करून होणारे साक्षगंध, लग्न, वराती, जेवनावळी यावर अशीच बंदी असावी, असा सूरही ग्रामीण भागातून येत आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये लग्नात होणारा वायफळ खर्च 90 टक्के कारणीभूत आहे. त्यामुळे या नवदाम्पत्यांनी शेतकरी आत्महत्यांनाही पायबंद घातला आहे. लॉकडाऊनमुळे कोठे प्रचंड नुकसान झाले असले तरी, गावखेड्यांत मात्र हे लॉकडाऊन बचतीचा मार्ग ठरले आहे.
 

शासनाने कायदाच करावा ः महाले
लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्न जमली आहेत. लॉकडाऊन आधीही अनेक सोयरीकी झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे धूमधडाक्यात लग्न करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसला. मराठा सेवा संघाने गेल्या 25 वर्षांपासून लग्नावर व इतर बाबींवर होणार्‍या वायफळ खर्चाबाबत प्रबोधन सुरू केले आहे. आता कोरोनाने वायफळ खर्च कायद्याने बंद झाला आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. शासनाने शेतकर्‍यांना इतर मदत करण्यापेक्षा लग्न व इतर समारंभाबाबत सहभागी संख्येचा कायदा केला तर, ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी दिली. 

वरातीही दुचाकीवर
एरव्ही लग्न म्हटले की, वरातीत पाच-पन्नास वाहनांचा ताफा ठरलेला असायचा. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात होते. मात्र, आता नवरीची पाठवणी चक्क दुचाकीवरच होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. यामधूनही दररोज लाखो रुपयांची बचत होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com