वृद्ध कलावंतांच्या मानधनाची प्रक्रिया ‘ट्रॅक’वर!

नितीन नायगावकर
सोमवार, 4 जून 2018

वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. येत्या काही दिवसांमध्ये यासंदर्भातील सर्व अडचणींवर आम्ही मात केलेली असेल.
- संजीव पालांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

नागपूर - राज्यभरातील वृद्ध कलावंतांची यादी अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यात शेकडोंचा नव्याने समावेश होत आहे. राज्य नाट्य स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये अडकलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या विषयाला सध्या प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू असलेली मानधनाची प्रक्रिया आता ट्रॅकवर येणार आहे.

बहुतांशी प्रभारी संचालकांच्या भरवशावर सुरू असलेल्या सांस्कृतिक संचालनालयाला नशिबाने ‘प्रभारी’देखील उत्साही भेटत आले; परंतु वृद्ध कलावंतांची यादी अद्ययावत करण्याचे काम समाज कल्याण विभागाच्या वतीने योग्यपद्धतीने झाले नाही आणि त्याकडे संचालनालयाचेही दुर्लक्षच झाले. पूर्वी समाज कल्याण विभागामार्फत कलावंतांना मानधन दिले जायचे. त्यामुळे प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात दोष होते. २०१६ मध्ये सांस्कृतिक संचालनालयाने थेट खात्यात मानधन जमा करण्याची योजना आणल्यामुळे काही प्रमाणात या अडचणींवर मात झाली. पण, यादी अपडेट करण्याचे काम मात्र संथगतीनेच होत राहिले. पूर्वी अजय आंबेकर आणि आशुतोष घोरपडे यांनी तर आता संजीव पालांडे या तीन संचालकांनी यात गांभीर्याने लक्ष घातले आहे. यादी अपडेट झाल्यानंतर जवळपास २५ टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता नवे संचालक संजीव पालांडे यांनी वर्तवली आहे. ‘समाज कल्याणचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बैठक व चर्चा सध्या सुरू आहे. जवळपास २२ जिल्ह्यांशी संवाद पूर्ण झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे राज्यातील काही वृद्ध कलावंतांपर्यंत मानधन पोहोचत नव्हते. हे सर्व अडथळे येत्या चार महिन्यांत दूर करणार आहे,’ असे पालांडे यांनी सांगितले.

वृद्ध कलावंत 
अ वर्ग -     ४४८
ब वर्ग -     ८२०
क वर्ग -     २५,८८२
एकूण -     २७,१५०

Web Title: old actor Honorarium process