
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
नागभीड : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव अडकू मारुती गेडाम (वय ५५, रा. नवेगाव हुंडेश्वरी) असे आहे.
सध्या शेतीचा हंगाम संपला आहे. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, महिला, युवक जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील अडकू मारुती गेडाम हे काही गावकऱ्यांसोबत गुरुवारी जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले. अडकू आणि गावकरी गोवरपेठ येथील कक्ष क्रमांक ७४२ परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तेंदूपत्ता संकलन करीत होते.
तेंदूपत्ता संकलन करीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अडकू गेडाम याच्यावर हल्ला केला. अडकू गेडाम यांनी आरडाओरड केली. मात्र, सहकारी पोहोचपर्यंत वाघाने अडकू यांना ठार केले होते. गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या परिसरात काही महिन्यांपासून वाघाचा वावर वाढला आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
Web Title: Old Man Went Collect Tendu Leaves Died Tiger Attack Killed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..