या मळ्यांमुळे एकेकाळी पवनी होते समृद्ध; आता लोपले ते ऐश्‍वर्य... 

Barai Samaj
Barai Samaj

पवनी (जि. भंडारा) : पवनी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तटबंदीचा परकोट, पुरातन मंदिरे, बौद्ध स्तूप, वैनगंगा नदीकाठावरील घाट शहराला लाभलेल्या इतिहासाची साक्ष देतात. पूर्वीच्या काळात शहरातील बारई समाजाचे नगरामध्ये मोठमोठे पानमळे होते. येथील कपुरी पानांच्या उत्पादनामुळे रोजगार, व्यापार आणि व्यवसाय फुलले होते. त्यामुळे शहराला समृद्धीचा वारसा मिळाला होता. परंतु, मर रोगामुळे येथील पानमळे नेस्तनाबूत झाले आहेत. 

पवनी शहरातील पानाची विशेषतः म्हणजे हे पान जास्त दिवस टिकते. पान मळ्यांना तांडे असे म्हणतात. शहरातील कुराडा वाडी, गुरुदेवनगर जवळील गाठा वाडी, तहसील कार्यालय परिसर, विश्राम गृहाच्या समोरील वगराची वाडी, मंगळवारी वॉर्डातील कवठे वाडी व रावणवाडी, जगन्नाथ वाडी हे पानमळे अस्तित्वात होते. आज या ठिकाणी उपनगर वसलेले आहे. तसेच शासकीय कार्यालये आहेत. सन 1948 नंतर आलेल्या मर रोगामुळे येथील पानमळे हळूहळू नष्ट होत गेले. सन 1965 ते 67 पर्यंत पानमळ्यांना पुन्हा जगविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, मर रोगापुढे पानमळे नेस्तनाबूत झाले. 

शहरामध्ये कपुरी पानाचे उत्पादन घेतले जात होते. प्रत्येक पानमळ्यामध्ये सामूहिकरीत्या पानवेलींची लागवड केली जात असे. वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात नागवेल (पानवेल) लावण्यात येत असे. एकदा लावलेली नागवेल 8 ते 10 वर्षे उत्पादन देते. येथे पान विकत घेण्यासाठी नागपूरवरून व्यापारी रेल्वेगाडीने निलज फाट्यावर रात्रीला येत असत. त्यामुळे पानांचा व्यवहार रात्रीला होत असे. पान उत्पादनामुळे बारई समाज आर्थिकरित्या समृद्ध झाला होता. तहसील कार्यालयात असलेल्या विहिरीतून वाडीला पाणी दिले जात होते. आजही ही विहीर अस्तित्वात आहे. 

मळ्यांमुळे रोजगारनिर्मिती 

पानमळ्यांमुळे इतर समाजातील लोकांनासुद्धा रोजगार मिळत होता. पानवेलीच्या लागवडीनंतर वेलींना आधार देण्यासाठी बांबूचे मंडप केले जात होते. वैनगंगा नदीवर बांध बांधणे, शेतातील दर्भ, खैराच्या झाडांचे बुंधे यांचा आधार दिला जात होता. पवनीसोबतच विदर्भातील भंडारा, नागपूर जिल्ह्यातील रामटेक, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव येथे पानाचे मळे होते. उन्हाळ्यात पानमळ्यांमध्ये एसी पेक्षाही थंडावा असायचा. पानवेलींना अधिक सूर्यप्रकाश व पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी पानमळ्यांवर मंडप बनविले जात होते. त्यावर गवताचे कुरवाड झाकल्या जात होते. आजच्या घडीला रामटेक येथे पान संशोधन केंद्र आहे, अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव रायपूरकर यांनी दिली. 

पानमळे बारई समाजाचा आधार 

मर रोग आल्याने पानमळे नष्ट झाले. यामुळे पवनीतील बारई समाजाचे अनेक लोक रोजगारासाठी बाहेर गावी गेले आहेत. सध्या येथील बारई समाज नागपूरवरून पानांची आयात करतो. यामध्ये कपुरी, बंगला, मीठा पानांचा समावेश होतो. आजही शहरामध्ये रायपूरकर, भोगे, बिसने, भोयर हे बारई समाजाचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सध्या बारई समाजाची लोकसंख्या 800 ते 900 आहे. यामधून 15 टक्‍के लोक पान विक्रीचा व्यवसाय करतात. गणेश वॉर्डमध्ये आजही बारई समाजाचे लोक राहतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com