एकेकाळी "त्याने' उपभोगले वैभव; आज झाले दुर्लक्षित 

नीलेश झाडे 
Sunday, 28 June 2020

चंद्रपूर जिल्ह्यावर गोंडराजांची सत्ता होती. गोंडराज्यात येणारा महत्त्वाचा परगणा म्हणून धाबा गावाची नोंद होती. धाबा परिसराला लागूनच आंध्रप्रदेशची (आजचा तेलंगणा) सीमा होती. गोंड, मराठे आणि ब्रिटिशांनी या भागाकडे विशेष लक्ष दिले होते. गोंडराजे आणि मराठे राजांनी बांधलेली मंदिरे आजही धाबा गावात गत वैभवाची साक्ष देत उभी आहेत.

धाबा (जि. चंद्रपूर)  : जिल्ह्यात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजे, मराठे राजांची गावावर सत्ता होती. या दोन्ही राजांनी गावात मंदिरांची निर्मिती केली. ही मंदिरे आजही गावात उभी आहेत. मराठ्यानंतर गावात ब्रिटिशांची सत्ता आली. ब्रिटिशांनी गावात अनेक सुधारणा केल्या. शाळा, पोलिस स्टेशनची निर्मिती केली. कधीकाळी "धाबा सोन्याचा गाभा' अशी गावाची ओळख होती. आज मात्र मागासलेल्या गावांच्या यादीत धाबा गावाची नोंद होते, हे मोठेच दुर्दैव आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यावर गोंडराजांची सत्ता होती. गोंडराज्यात येणारा महत्त्वाचा परगणा म्हणून धाबा गावाची नोंद होती. धाबा परिसराला लागूनच आंध्रप्रदेशची (आजचा तेलंगणा) सीमा होती. गोंड, मराठे आणि ब्रिटिशांनी या भागाकडे विशेष लक्ष दिले होते. गोंडराजे आणि मराठे राजांनी बांधलेली मंदिरे आजही धाबा गावात गत वैभवाची साक्ष देत उभी आहेत. मराठ्यांच्या सत्तेनंतर येथे ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांनी गावाचा चेहरा-मोहरा बदलविला. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा धाबा गावात सुरू केली. या शाळेची इमारत शंभर वर्षानंतर आजही उभी आहे. येथे भव्य असे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन होते. याच जागेवर आज नवे पोलिस स्टेशन आहे. धाबा परिसरातील वनक्षेत्र घनदाट होते. या जंगलात शिकार करण्यासाठी लांबवरून ब्रिटिश येत होते. त्याच्या नोंदी आजही सापडतात. 

अवश्य वाचा- अखेर जन्मदात्री आईच निघाली नवजात मुलीची खुनी!

ब्रिटिशकाळात धाबा गावाने वैभवाचे उच्च शिखर गाठले होते. याच काळात "धाबा सोन्याचा गाभा' अशी उपाधी गावाला लाभली. मात्र, कालौघात गावाचे वैभव धुळीस मिळाले. कधीकाळी जिल्ह्यातील महत्त्वाचा परगणा असलेल्या धाबा गावाची ओळख आज मात्र मागासलेले गाव म्हणून केले जाते. 

आज संतनगरी अशी ओळख... 

धाबा गाव श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांची कर्मभूमी आहे. येथे महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील भक्त हजारोंच्या संख्येने समाधीच्या दर्शनासाठी येतात. कोंडय्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाबा गावाला आज संतनगरी म्हणून ओळखले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Once upon a time Dhaba had a glorious history. today it has been ignored