विवाहितेच्या खुनाचे सत्य आले समोर : पैशांवरून वाद झाल्यानंतर प्रियकराने डोक्‍यावर मारला होता रॉड

One arrested in Yavatmal Woman murder case
One arrested in Yavatmal Woman murder case

वणी (जि. यवतमाळ) : येथील पटवारी कॉलनीतील ३२ वर्षीय विवाहितेचा वांजरी शेतशिवारात खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत संशयित आरोपीचा छडा लावून खूनात वापरलेला रॉड व चारचाकी वाहन जप्त केले.

संजय शामराव सालवटकर (वय ४२, रा. साखरा ता. वरोरा जि. चंद्रपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मृत विवाहिता ही पिंपळगाव येथे वास्तव्यास होती. तिचे लग्न वरोरा येथील आवारी यांच्यासोबत १२ वर्षांपूर्वी झाले होते. परंतु, तिचे पतीसोबत पटत नव्हते. त्यातच तिची ओळख संजयसोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

मागील दहा वर्षांपासून ते दोघे एकमेकांना भेटत असल्याची बाब पतीला समजल्यानंतर ते दोघे विभक्त झाले. आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिने वणीतील पटवारी कॉलनीत भाडेतत्त्वावर घर घेतले व राहायला लागली. घटनेच्या दिवशी संशयित संजय तिला भेटायला वणीत आला. तिला वरोरा मार्गावरील जगन्नाथ महाराज मंदिराजवळ बोलावले.

रात्री आठच्या सुमारास तिने मुलांना मामाकडे जाऊन येत असल्याचे सांगत मंदिराजवळ पोहोचली. टाटा सुमोमध्ये (क्रमांक एम. एच. ३४ ए. व्ही. ९५२४) बसून ते दोघे नांदेपेरा मार्गावरील वांजरी शिवारात बडवाईक यांच्या शेतातील गोठ्याजवळ पोहोचले. तेथे त्यांच्यात पैशांवरून वाद झाला.

त्यात संजय सालवटकरने वाहनातून रॉड काढून तिच्या डोक्‍यावर मारल्याने गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. त्यानंतर पुन्हा त्याने मोठ्या दगडाने डोक्‍यावर वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी कोणताही पुरावा मागे राहू नये, म्हणून संजयने तिचा मोबाईल घेऊन पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांनी स्थानिक डीबी पथक व शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांच्यावर तपासाची जबाबदारी दिली. अवघ्या सहा तासांत संशयित संजयला ताब्यात घेतले. खूनात वापरलेला रॉड, चारचाकी वाहन व विवाहितेचा मोबाईल जप्त करण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com