esakal | मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Matoshriwar Prem Vivah Anamkaran Sohala, MLA Gaikwads initiative

तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील पीडित मुलीबाबत बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांना कळताच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागरूक झाला. एका मुलाला बाप, युवतीला नवरा आणि प्रियकराला त्याचा परिवार मिळवून देण्याचे भाग्य आमदार श्री. गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी आले आहे.

मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील पीडित मुलीबाबत बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांना कळताच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागरूक झाला. एका मुलाला बाप, युवतीला नवरा आणि प्रियकराला त्याचा परिवार मिळवून देण्याचे भाग्य आमदार श्री. गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबी आले आहे.

ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्री येथून अनेकांचे नशीब घडविले तसाच काहीसा प्रत्यय बुलडाणा येथील मातोश्रीवर आज (ता.13) घडला तो विवाहाच्या मंत्रोपचार आणि टाळ्यांच्या कडकडाटाने.डोंगरखंडाळा प्रियसी आणि वडगाव येथील प्रियकर यांचा आज अनेकांच्या उपस्थित लग्न लावून दिल्याने समाजात एक चांगला संदेश दिला आहे


तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील युवतीचे वडगाव येथे राहणार्‍या एका युवकासोबत सूत जुळले. नात्याने आतेभाऊ असलेला युवक असल्यामुळे घरी ये-जा वाढली. त्यातून एक मुलगाही झाला. परंतु, समाज काय म्हणणार या भीतीने सदर युवतीने ते नवजात अर्भक झुडपात टाकून दिले होते.

या दरम्यान त्या अर्भकाला कुत्र्यांनी चावा देखील घेतला होता. जखमी झालेल्या बाळाला बुलडाणा ग्रामीण पोलिस व महिला बाल कल्याण अधिकारी यांच्या पुढाकारातून जिल्हा सामान्य रुग्णालय व नंतर अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. बाळ अवघ्या काही दिवसाचे असल्यामुळे पोलिस व न्यायालयाच्या आदेशाने त्या मातेचा शोध घेण्यास पोलिसांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले. ठाणेदार सारंग नवलकर यांच्या प्रयत्नाने ती माता सापडली.

बाळाला दूध मिळावे यासाठी रुग्णालयात त्या मातेला दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सदर युवती ही बाळासोबत राहिल्यामुळे मातेच्या वात्सल्य उफाळून आले व तिने बाळाचा सांभाळ स्वतच करणार असल्याची भूमिका घेतली. यातच घरच्यांनी बाहेरचा रस्ता दाखविल्यामुळे मोठी अडचण झाली. युवती बाळाला येऊन बुलडाण्यात भटकंती करू लागली. मिळेल ते खाऊन बाळाचा सांभाळ करत होती.

याबाबत आमदार संजय गायकवाड यांना माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ महिलेच्या खाण्यासह राहण्याची व्यवस्था करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर व त्या युवतीचा प्रियकराला कार्यालयात बोलावून समज दिला. त्यानंतर प्रियकराने प्रियसी व बाळाचा सांभाळ करण्याची सहमती दर्शविली. ठाणेदार सारंग नवलकर व महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती राठोड यांच्या उपस्थितीत आज मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात दोघांचे लग्न लावून देण्यात आले.

यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोख रक्कमही मदत म्हणून देण्यात आली. मंगलअष्टक आणि टाळ्यांच्या गजरात विवाह उरकण्यात आला. यावेळी धडाडीने आमदार संजय गायकवाड यांनी घेतलेला या निर्णयाचे सर्वांनी कौतुक करत आदर्श निर्माण केल्याची चर्चा होती. यापूर्वी त्यांनी दोन लग्न लावून देत संसार फुलविण्याचे कार्य केले. यावेळी युवा नेते मृत्यूजंय गायकवाड, ठाणेदार नवलकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मातोश्रीवरच झाला नामकरण कार्यक्रम
पीडित युवती आणि प्रियकराचा विवाह लागल्यानंतर त्या बालकाचा नामकरण विधीचा कार्यक्रमही आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातच पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी त्या बाळाचे नाव स्वराज म्हणून ठेवले. यावेळी उपस्थितीत महिलांनी पाळणा हलवीत पेढे वाटून कार्यक्रम साजरा केला.

अन् पाणावले अनेकांचे डोळे
बहुधा पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीच्या जनसंपर्क कार्यालयात एकाच वेळी विवाहही पार पडतो आणि बाळाचे नामकरणही होते. या प्रसन्न आणि भावुक झालेल्या वातावरणामुळे उपस्थितांचे डोळे मात्र पाणावले होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image