धारणीजवळील केसरपूर गावात कशामुळे झाला हल्ला, कुणी केला?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

केसरपूर गावात शेतीच्या जुन्या वादातून आज दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. यात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले.

धारणी : दोन गटात वाद झाला आणि राग अनावर झाल्याने एका गटातील लोकांनी अन्य लोकांवर हल्ला केला. त्यात एकाला आपला जीव गमवावा लागला. पोलिस गावात दाखल होईपर्यंत या सुनियोजित हल्याची स्थानिकांना माहिती नव्हती.

धारणी येथून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरपूर गावात शेतीच्या जुन्या वादातून आज दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली. यात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींसह मृतकाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावती येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. रुग्णवाहिका नसल्याने मृत आणि जखमींना खासगी वाहनात धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धारणीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या केसरपूर गावातील श्‍यामलाल सावलकर व त्यांच्या सहकारी रामलाल सावलकर, मोजीलाल सावलकर यांच्यासह पंधरा ते वीस लोकांनी भाला व कुऱ्हाडीने हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वाचा - या जिल्ह्यातील तीन गावांना दरवर्षीच होतो पुराचा वेढा...पावसाळ्यात तुटतो संपर्क

या हल्ल्यात जाफूलाल बाबूलाल चिमोटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रूपलाल संतोष, शिवचरण, मंगल, सुमन चिमोटे यांच्यासह सहाजण गंभीर जखमी झाले. त्यांना केसरपूरवरून धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले. या आधी याच प्रकरणाची धारणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सांगितले. न्यायालयात देखील शेतीचा वाद सुरू होता. पुढील तपास धारणी पोलिस करत आहे. विशेष म्हणजे, 15 ते 20 लोकांनी केलेल्या सुनियोजित रक्तरंजित खुनी हल्ल्याची स्थानिकांनाही माहिती झाली नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead, several hurt after two group clash