नववर्षाच्या सुरुवातीलाच मन सुन्न करणारी घटना, एकाच्या आनंदाने दुसऱ्याचा अंत

रूपेश खैरी
Saturday, 2 January 2021

नेहमीप्रमाणे रौनक सबाने हा मॉर्निग वॉकसाठी बॅचलर रोडवर फिरायला गेला होता, तर पोलिस शिपाई सचिन दीक्षित हा नववर्षाची पार्टी करून आर्वी नाक्‍याकडे एमएच 06-बीई 4711 या क्रमांकाच्या कारने जात होता.

वर्धा : नववर्षाच्या पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला भरधाव पोलिसाच्या वाहनाने चिरडले. यात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. 1) पहाटे बॅचलररोडवरील वैष्णवी कॉम्प्लेक्‍सजवळ घडला. रौनक सुबोध सबाने (वय 35) रा. सर्कस ग्राउंड, रामनगर असे मृताचे नाव आहे. पोलिस शिपाई सचिन दीक्षित (रा. तुळजाईनगर सिंदी (मेघे)) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा - धोका! मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढणार; शैक्षणिक...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रौनक सबाने हा मॉर्निग वॉकसाठी बॅचलर रोडवर फिरायला गेला होता, तर पोलिस शिपाई सचिन दीक्षित हा नववर्षाची पार्टी करून आर्वी नाक्‍याकडे एमएच 06-बीई 4711 या क्रमांकाच्या कारने जात होता. दरम्यान, त्याची कार वैष्णवी कॉम्प्लेक्‍सजवळ पोहोचताच या कारने रौनकला जबर धडक दिली. या भीषण धडकेत रौनक काही अंतरावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कार वीजखांबाला धडक देत उलटी झाली. 

हेही वाचा - कोरोना लसीचा ‘ड्राय रन’; लस उपलब्ध झाल्यानंतर तीन टप्प्यांमध्ये लसीकरण

अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत रौनकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला, तर कार ताब्यात घेत आरोपी सचिन दीक्षित याला अटक केली. याप्रकरणी अभिजित सबाने यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा - सातासमुद्रापार वाजतो 'तिच्या' कलेचा डंका;...

थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात -
या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. अपघाताचा थरार पाहून अंगावर शहारे उभे होण्यासारखे आहे. पोलिस शिपाई वर्धा शहर पोलिसांत सेवा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in accident in wardha