मुलांसाठी दिवाळीची खरेदी केली अन् घरी निघाला, पण रस्त्यातच काळाने केला घात

रूपेश खैरी
Saturday, 14 November 2020

दोघेही भाऊ वर्धा येथे दिवाळीची खरेदी करायला गेले होते. झडशी-येळाकेळी   मार्ग समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झाला आहे. म्हणून ते कारखाना मार्गे गिरोली येथे आपल्या दुचाकीने येत होते.

सेलू (जि. वर्धा) : वर्ध्यावरून दिवाळी सणाची खरेदी करून गिरोली (ढगे) येथे परत येत असताना रस्त्यावरील केबलला लटकून झालेल्या अपघातात एका भावाचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसरा भाऊ किरकोळ जखमी झाला. हा अपघात येळाकेळी-सुकळीदरम्यान बाराहाते सभागृहाजवळ शुक्रवारी (ता. 13) दुपारी दोन वाजता घडला. शंकर पुरुषोत्तम उरकुडे (वय 28) असे मृताचे तर रोशन पुरुषोत्तम उरकुडे (वय 26) , असे जखमीचे नाव आहे. 

हेही वाचा - Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

दोघेही भाऊ वर्धा येथे दिवाळीची खरेदी करायला गेले होते. झडशी-येळाकेळी   मार्ग समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झाला आहे. म्हणून ते कारखाना मार्गे गिरोली येथे आपल्या दुचाकीने येत होते. दरम्यान, येळाकेळीच्या बाराहाते सभागृहाजवळ केबल टाकण्याचे काम सुरू आहे. केबल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर आलेल्या केबलला लटकून अपघात झाला. यात मोठा भाऊ शंकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लहान भाऊ रोशन हा किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच  घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. मृताचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याला एक मुलगी आहे. या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died and one injured in two wheeler accident in selu of wardha