
चांदूररेल्वे तालुक्यातील अमदौरी येथील सासऱ्यांची भेट घेऊन परत आपल्या मुलाबाळांकडे धामणगाव येथे परत येत असताना टाटा एस. व दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला.
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : आपल्या कुटुंबीयांचे कुशलक्षेम सांगून ते परत गावाकडे निघाले. सोबत घरच्यांसाठी काही जिन्नसही खरेदी केले होते. सासऱ्याच्या घरून निघाल्याने त्यांनी मुलीसाठी काहीतरी दिले होते. कुटुंबातील सर्वांचा निरोप घेऊन ते घरच्या वाटेने दुचाकीने निघाले खरे, परंतु दुर्दैवाने त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरला. वार्ता कानी येताच अरे जावाई, सासऱ्यांची ती भेट अखेरचीच ठरली, असे हताश उद्गार शहरवासीयांच्या तोंडून निघाले.
चांदूररेल्वे तालुक्यातील अमदौरी येथील सासऱ्यांची भेट घेऊन परत आपल्या मुलाबाळांकडे धामणगाव येथे परत येत असताना टाटा एस. व दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. 21) सायंकाळी सव्वासहा वाजतादरम्यान चांदूररेल्वे-धामणगाव रोडवर मांडवा गावाच्या वळणावर घडली. यात राजेंद्र अंबादास बुटलेकर, रा. कृष्णा कॉलनी धामणगाव रेल्वे यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...
विविध प्रशिक्षण देणाऱ्या मिटकॉनमध्ये असलेले राजेंद्र बुटलेकर यांच्या अकस्मात जाण्याने धामणगाव रेल्वे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपल्या मुलीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत तिला अभियंता बनविले तसेच मुलाला कृषी अभियंता अधिकारी बनवण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताने कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. बुधवारी धामणगाव रेल्वे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी विशाखा मुलगा कुणाल वडील, आई, भाऊ असा मोठा गोतावळा आहे.
अलीकडे नव्याने तयार झालेल्या अमरावती धामणगाव एक्स्प्रेस हायवेवर चांदूररेल्वे ते धामणगाव रेल्वेदरम्यान अनेक वळण मार्ग आहेत. सदर वळण मार्गांवर यापूर्वी अपघात घडले असून, आता हा रस्ता अत्याधुनिक झाल्याने सुसाट पळणाऱ्या वाहनांवर कुठलेच नियंत्रण नसल्याने नेमके वळण मार्ग कर्दनकाळ ठरत आहेत. त्यामुळे एक तर वळण मार्ग सरळ करावे किंवा वेग प्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
संपादन : अतुल मांगे