ऑनलाईन काजू, विलायची मागवताय, जरा थांबा... अमरावतीत घडली ही घटना

संतोष ताकपिरे
Sunday, 9 August 2020

व्यावसायिक कामासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर बरेच व्यापारी करू लागले. नूरनगर येथील मोहंमद सादिक यांनी सुद्धा स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर त्यांना काजू आणि विलायचीच्या मालाची गरज असल्याची पोस्ट टाकली.

अमरावती : सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन  खरेदीःव्रिक्री वाढली आहे. परंतु वाढत्या ऑनलाईन व्यवहारामुळे धोकेही वाढले आहेत. फ्रॉड करणारे एवढे बहाद्दर आहेत की, नेहमी लाखोंचा व्यवहार करणा-यांनाही मामा बनवितात. सोशल मीडियावर काजू, विलायचीचे फोटो पाठवून केलेला खरेदीचा व्यवहार अमरावतीच्या एका व्यापा-याला एक लाख चाळीस हजार रुपयांत पडला. 

मोहंमद सादिक मोहंमद शाकीर (वय ३२, रा. नूरनगर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. लॉकडाउनमध्ये बाजारात जाऊन प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी अनेक जण धजावत नाहीत. त्यामुळे व्यावसायिक कामासाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर बरेच व्यापारी करू लागले. नूरनगर येथील मोहंमद सादिक यांनी सुद्धा स्वत:च्या फेसबुक अकाउंटवर त्यांना काजू आणि विलायचीच्या मालाची गरज असल्याची पोस्ट टाकली. त्याचवेळी त्यांना बंगलोर येथील सय्यद सोहेल यांनी काजू आणि विलायचीच्या काही सॅम्पलचे फोटो मोहंमद सादिक यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. 

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार हिंदू विरोधी, कोणी केला हा आरोप, वाचा

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव 

फोटोमध्ये दिसणारी काजू व विलायची मो. सादिक यांना पसंत पडली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता पन्नास किलो विलायची व चाळीस किलो काजूची ऑर्डर अनोळखी व्यक्तीला दिली. ही ऑर्डर मारोती एअर कुरिअरने पाठवीत असल्याची बतावणी केली. त्यासाठी त्याने स्वत:चा बँक खाते क्रमांक सोशल मीडियावर पाठविला. त्या खात्यात अमरावतीच्या मोहंमद सादिक यांनी एक लाख चाळीस हजार रुपये त्याला पाठविले. २५ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत कोणताही माल बंगलोरच्या संबंधिताने अमरावतीत पाठविला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मो. सादिक यांनी नागपूरीगेट ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
--
नागरिकांनी सावध रहावे
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये, त्यातून फसवणूकीची शक्यता अधिक असते. अशा लोकांपासून नागरिकांनी सावध राहावे.
- अर्जुन ठोसरे, पोलिस निरीक्षक, नागपुरीगेट ठाणे, अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh forty thousand rupees fraud in Cashew nuts sold online