घर जाळल्याचा बदला घ्यायला गेला; मात्र, स्वतःचाच जीव गमावला

संतोष ताकपिरे
Tuesday, 27 October 2020

गेल्या वर्षी त्याने नीलेशच्या घराला आग लावून नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली होती. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशीच निशांतने नीलेशच्या घराला आग लावून नुकसान केले होते.

अमरावती : गेल्या वर्षी घर जाळल्याचा बदला घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना महाजनपुरा परिसरातील दत्तूवाडी येथे रविवारी घडली. निलीश रामदास हिरुळकर (वय ३०), असे मृत तरुणाचे नाव असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निशांत दिलीप इंगळे, असे आरोपीचे नाव असून गेल्या वर्षी त्याने नीलेशच्या घराला आग लावून नुकसान केले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली होती. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशीच निशांतने नीलेशच्या घराला आग लावून नुकसान केले होते. तेव्हा पोलिसांनी कारवाईदेखील केली होती. त्या घटनेपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती.  

हेही वाचा - ‘चल ऑटोमध्ये फिरून येऊ’ असे म्हणत केले अपहरण; पैसे मिळणार नसल्याचे बघून मावशीच्या घराजवळ दिले सोडून

नीलेश व त्याचा मित्र अक्षय उज्जैनकर यांनी दसऱ्याच्या दिवशीच निशांतला धडा शिकवावा या उद्देशाने प्लॅन रचला. दोघेही रात्रीच निशांत इंगळे याच्या घरी गेले. त्याठिकाणी त्यांच्यात वाद सुरू झाला. निशांतला मारण्याच्या उद्देशाने गेलेल्या अक्षय व नीलेश या दोघांवर उलट निशांतनेच चाकूने सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नीलेश हिरूळकरचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेनंतर इंगळे फरार झाला. पोलिसांनी गंभीर जखमी अक्षय उज्जैनकरच्या तक्रारीवरून इंगळे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला बारा तासांच्या आत अटक केली.

हेही वाचा - भंडारा : फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणला; फटाका सेंटरच्या आगीत दोन दुकान खाक

अक्षयच्या तक्रारीवरून तातडीने गुन्हा दाखल केला. घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि तक्रारीत व्यक्त केलेली हकीकत यात विरोधाभास दिसून येतो. त्याचा बारकाईने तपास केला जाईल.
-अतुल घारपांडे, पोलिस निरीक्षक, खोलापुरीगेट ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person murdered in amravati