सरकार...कांदा घ्या कांदा, नाही तर शेतकऱ्यांचा होईल वांदा

अनुप ताले
Thursday, 23 April 2020

केंद्र सरकारने नाशिक परिसरात नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातही सुमारे सहा हजार एक्करवर कांदा उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या धर्तीवर अकोल्यातही केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून होत आहे.

अकोला : केंद्र सरकारने नाशिक परिसरात नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातही सुमारे सहा हजार एक्करवर कांदा उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या धर्तीवर अकोल्यातही केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून होत आहे.

 

आतापर्यंत दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिट, कीड, तण इत्यादी कारणांनी शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानाला ‘मानवांमध्ये पसरलेला कोरोना विषाणू’ कारणीभूत ठरला आहे. अचानक उद्‍भवलेले कोरोनाचे संकट जगभरात सध्या थैमान घालत असून, भारतातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च पासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात आले. याचा परिणाम वाहतूक व प्रामुख्याने शेती व्यवसायावर झाला. शेतमाल काढणीपासून ते विक्रीपर्यंत अडचणी निर्माण झाल्याने, शेतमाल शेतातच खराब होत आहे. अकोला जिल्ह्यातही फुलशेती, भाजीपाला पिके, फळपिके, गहू, कापूस, हरभरा, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही कांदा उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात सुमारे 6000 एक्करवर यंदा कांदा उत्पादन घेण्यात आले असून, हे सर्व कांदा उत्पादन शेतातच खराब होत आहे. नाशिक परिसरात मात्र कांदा उत्पादकांना दिलासा देत, केंद्र सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर अकोला जिल्ह्यातही केंद्र सरकारने नाफेडद्वारे कांदा खरेदी करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडून होत आहे.

 

तेल्हारा तालुक्यात 2600 एकरावर कांदा
जिल्ह्यात सर्वाधिक तेल्हारा तालुक्यात 2600 एकरावर कांदा उत्पादन घेतले जात आहे. परंतु, लॉकडाउनमुळे व वाहतूक तसेच शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीची झाल्याने संपूर्ण उत्पादन शेतातच खराब होत आहे. केंद्र सरकारने नाफेडद्वारा नाशिक परिसरात कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर तेल्हारा परिसरात व उर्वरित महाराष्ट्रात नाफेडद्वारे कांदा खरेदी करुन सरकारने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- विलास ताथोड, सोशल मीडिया राज्य प्रमुख, शेतकरी संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onions in Akola should be procured by the Central Government