पाच वर्षांत प्रथमच पीककर्ज वाटपाची टक्केवारी ६२ वर, तरीही शेतकरी वंचितच

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 27 December 2020

खरीप हंगामात पीककर्जासाठी 2 लाख 64 हजार 693 शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी 1 लाख 23 हजार 681 शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला.

अमरावती : कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून व त्रास सहन करीत जिल्ह्यातील 1 लाख 23 हजार 681  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर 1 लाख 41 हजार 12 शेतकरी कर्जापासून वंचित राहिले.

हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही...

खरीप हंगामात 1720 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते. त्यापैकी 1073 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 69 हजार 21 शेतकऱ्यांना 676 कोटी 70 लाख रुपये, खासगी क्षेत्रातील बँकांनी 1518 शेतकऱ्यांना 36 कोटी 23 लाख रुपयांचे, तर ग्रामीण बँकांनी 1394 शेतकऱ्यांना 16 कोटी 55 लाख व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 51 हजार 748 शेतकऱ्यांना 344 कोटी 46 लाख रुपये कर्जवितरण केले. कर्जवाटपाची सरासरी 62 टक्के इतकी आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पाच कोटींची मागणी, निवडणूक विभागाचा प्रस्ताव

खरीप हंगामात पीककर्जासाठी 2 लाख 64 हजार 693 शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी 1 लाख 23 हजार 681 शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला. त्यातही कर्जमाफीसाठी प्रकरणे तयार करून बँकांना पाठविण्याचा भार सहकार विभागावर होता. यामध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, आधार प्रमाणीकरण अशा तांत्रिक अडचणींसोबत कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता. कमी मनुष्यबळातही या विभागाने कर्जमाफी व पीककर्जाची प्रकरणे केलीत आणि कर्जवाटपाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत प्रथमच 62 टक्‍क्‍यांवर नेली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 62 percentage crop loan distributed in 2020 in amravati