क्वारंटाइनच्या टायमाले... वावर हाय तं पावर हाय!

pusad
pusad
Updated on

पुसद (जि. यवतमाळ)  : उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या कोविड-19 विषाणूने संपूर्ण जगाला क्वारंटाईन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान व अण्वस्त्रांचा अहंकार बाळगणाऱ्या महासत्तांना भीतीने घरात बसविले. जगातील सर्वच इंडस्ट्रीज लॉकडाउन झाल्यात. परंतु, ऊन, थंडी, पाऊस व वादळात राबणाऱ्या शेतकऱ्यांची ऍग्रो इंडस्ट्री न थकता सुरू आहे. शेतीत अन्नधान्य, भाजीपाला पिकवून घरात थांबलेल्या लोकांना जगाचा पोशिंदा अन्नाचा घास भरवितो आहे. 'खरा राजा शेतकरीच', हे मोठे सत्य कोरोनाने उघड केले आहे. तरीदेखील खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न कोरोनानंतरच्या जगात सुटतील का? शेतकऱ्यांच्या अशा आशाळभूत नजरा आता भिरभिरत आहेत.

लॉकडाऊनने भौतिक सुविधांच्या मागे लागलेल्या लोकांना चांगला धडा शिकविला आहे. सर्वजण घरात आहेत, तेव्हा सर्वांना प्रश्न पडला भुकेचा. अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तू कशा मिळतील? ही चिंता सतावत आहे. बँकेतील पैसा, लक्‍झरी गाडी, रंगीत टीव्ही यासारख्या भौतिक गोष्टींचे काही मूल्य उरले नाही. अशा स्थितीत शेतकरी शेतात राबत आहेत. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध या जीवनावश्‍यक वस्तू मोठ्या कष्टाने पुरवीत आहेत. सर्व इंडस्ट्रीज बंद पडल्या तरी चालेल, पण शेती बंद पडता कामा नये, हाच संदेश लॉकडाऊनने स्पष्टपणे दिला आहे.
आभाळाच्या छताखाली, काळ्या आईच्या हृदयात शेतकरी कष्टाने बीज रोवतो, घाम गाळत मशागत करतो. पिकांचा घास तोंडाशी आला की अस्मानी संकटाने तो घेरला जातो. अशावेळी सुलतानी संकटांना झेलताना त्याचा तोल जातो. परंतु, त्याला सावरण्यासाठी योग्य उपाययोजना, धोरणांची वानवा दिसून येते. परिणामस्वरूप शेतकरी आत्महत्या होतात, हे वास्तव सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची  गरज आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अनेकांनी टीकेची राळ उठवली. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला डिवचण्यात आले. परंतु, शेतकऱ्याला कधीही कर्जमाफी नको असते. त्याला हवे असतो घामाचा दाम. शेतमालाला योग्य भाव. परंतु, येथेच त्याचा अपेक्षाभंग होतो. त्याचे मनोबल खचल्याने तो फासाचा दोर गळ्याभोवती आळवण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतो. कोरोनाच्या युद्धात जगातील कोणती इंडस्ट्री धावून आली? केवळ शेतकऱ्यांची ऍग्रो इंडस्ट्री. कोरोनानंतर शेतीला ऍग्रो इंडस्ट्रिचा दर्जा दिला तरी अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा शेतकरी लॉकडाऊनच्या काळात व्यक्त करीत आहेत.

नगदी पिकांची किंमत मातीमोल!
टाळेबंदीच्या या काळात शेतकऱ्यांची रब्बी पिके शेतात उभी आहेत. फुलशेती, शेवगा, भाजीपाला, टरबूज अशा नगदी पिकांची किंमत मातीमोल झाली आहे. शेतकऱ्यांच्या "ऍग्रो इंडस्ट्री'ला मोठा फटका बसला आहे. तरी त्याचे दातृत्व कोरोनाला नामोहरम करणारे आहे. शेतातील पिकलेला गहू, भाजीपाला, फळे गरजूंना मोफत वाटणारा शेतकरी खऱ्या अर्थाने कोरोना युद्धातील मोठा लढवय्या आहे. 'जिवाच्या भीतीने प्रत्येकजण क्वारंन्टाईन होताे आहे. शेतकरी मात्र, हिंमतीने म्हणत आहे "वावर हाय तं पावर हाय!".
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com