esakal | व्याघ्रप्रकल्पाच्या दत्तक योजनेकडे पाठ, हत्तीला दत्तक घेणारे बच्चू कडू एकमेव
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चू कडू

व्याघ्रप्रकल्पाच्या दत्तक योजनेकडे पाठ, हत्तीला दत्तक घेणारे बच्चू कडू एकमेव

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : प्राण्यांविषयी नागरिकांना ममत्व वाटावे त्यांच्यात जवळीक निर्माण व्हावी, सोबतच मिळणाऱ्या उत्पन्नातून हत्तीचे संगोपन करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये मेळघाट व्याघ्रप्रकल्पात दत्तक योजना (melghat tiger reserved adoption scheme) सुरू करण्यात आली. मात्र, ही योजना सुरू झाल्यापासून केवळ राज्यमंत्री बच्चू कडू (minister bachchu kadu) यांनी हत्तीला दत्तक घेतले होते. अद्यापही प्राण्यांविषयी आस्था असणाऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही दत्तक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. (only bachchu kadu adopt elephant under melghat tiger reserved adoption scheme)

हेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील कोलकास येथे चार मादी हत्ती आहेत. ज्यांची नावे चंपाकली, लक्ष्मी, जयश्री, सुंदरमाला आहेत. या चारही हत्तींना दत्तक घेण्यासाठी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाकडून 2018 मध्ये दत्तक योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चंपाकली या हत्तीला दत्तक घेतले होते. मात्र, त्यानंतर कोणीही येथील हत्तींना दत्तक घेतले नाही. परिणामी ही योजना बंद होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. सदर दत्तक योजनेत मेळघाटच्या एका हत्तीसाठी प्रति महिना 21 हजार 500 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येते. या दत्तक योजनेंतर्गत ज्यांनी जो हत्ती दत्तक घेतला तो हत्ती त्या कालावधीमध्ये दत्तक घेणाऱ्यांच्या नावाने ओळखला जातो. मात्र, दत्तक हत्तीला घरी घेऊन जाता येत नाही. विशेष म्हणजे, या दत्तक योजनेत भरलेले शुल्क शासनाच्या नियमाप्रमाणे आयकरात 80 टक्के सूट मिळण्याचे प्रावधान आहे. सोबतच दत्तक घेणाऱ्यासाठी सुविधाही उपलब्ध आहेत. यामध्ये तीन महिन्यांसाठी एका हत्तीला दत्तक घेतल्यास 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सोबतच दत्तक घेणाऱ्या जोडप्यासाठी सेमाडोह, हरिसाल येथे दोन रात्र राहण्याची सोय, दोन हत्तींवर जंगल सफारी, हत्ती सोबत नदीत आंघोळ यासह आणखीन काही सुविधा देण्यात येतात. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाची ही दत्तक योजना प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी आनंददायी व सुवर्णसंधी असली तरी बच्चू कडू यांच्या व्यतिरिक्त अद्यापही दत्तक घेण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याचे मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या सेमाडोहचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी सांगितले.

loading image