विद्यार्थ्यांचा गणवेश कोरोनाने पळविला, यंदा एकाच गणवेशावर सत्र

श्रीकांत पेशट्टीवार
Monday, 1 February 2021

मागीलवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात देशात टाळेबंदी करण्यात आली. जवळपास एक महिना सगळेच बंद होते. टाळेबंदीमुळे आठवी, नववीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाही.

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षी राज्य शासनाने अनेक योजनांना कात्री लावला. त्याचा कमी जास्त फटका राज्य शासनाच्या सर्वच विभागांना बसला. राज्य शासन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी देते. यंदा गणवेशाच्या निधीलाही कात्री लागली. चंद्रपूर जिल्ह्याला दरवर्षी गणवेशासाठी पाच कोटी 36 लाखांचा निधी देण्यात येतो. यंदा दोन कोटी 65 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रती विद्यार्थ्यास केवळ एक गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांना सत्र काढावे लागणार आहे. 

हेही वाचा - भाजपकडून महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी, अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी

मागीलवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यात देशात टाळेबंदी करण्यात आली. जवळपास एक महिना सगळेच बंद होते. टाळेबंदीमुळे आठवी, नववीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाही. त्यानंतरही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर सुरू होता. कोरोनामुळे शाळेचे सत्र लांबणीवर पडले. शाळा, कॉन्व्हेंटमधून ऑनलाइन शिकविणे सुरू करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. प्रारंभी काही दिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. मात्र, नंतर ती हळूहळू वाढू लागली. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले. त्यानुसार 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाची पार्श्‍वभूमी बघता सर्व उपाययोजना करूनच या शाळांतील वर्ग सध्या सुरू आहेत. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना : आई-वडिलांनी टोकाच्या निर्णयात मुलीलाही घेतले सोबत; जड मनाने घेतली नदीत उडी

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय आश्रमशाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एक हजार 570 शाळा आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यंदा कोरोनामुळे शालेय सत्र लांबणीवर पडले. ते आता सुरू करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेने गणवेशासाठी लागणाऱ्या निधीची मागणी केली. दरवर्षी पाच कोटी 36 लाखांचे अंदाजपत्रक गणवेशासाठी पाठविण्यात येते. सत्र सुरू होण्याचे निर्देश प्राप्त झाल्यावर समग्र शिक्षा अभियानातून गणवेशाचे अंदाजपत्रक पाठविण्यात आले. गणवेशासाठी दोन कोटी 65 लाखांचाच निधी मिळाला आहे. अर्धाच निधी मिळाल्याने त्यातून आता प्रत्येक विद्यार्थ्यास एकच गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. गणवेशासाठी लागणारा निधी आता प्राप्त झाला आहे. तो आता पंचायत समित्यास्तरांवर पाठविण्यात आला आहे. 

हेही वाचा - घरगुती उपचार, गोळ्या घेऊ नका; सुरक्षित गर्भपातासाठी आहे ‘मर्जी हॉटलाइन’; माहितीअभावी...

गणवेशासाठी 2 कोटी 65 लाखांचा निधी मिळाला आहे. तो पंचायत समितीस्तरावर पाठविण्यात आला आहे. निधीच कमी मिळाल्याने प्रती विद्यार्थ्यास दोनऐवजी एकच गणवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील 80 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश दिला जातो. 
-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्रा), जि. प. चंद्रपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only one uniform allotted to student in chandrapur